बेळगाव-सावंतवाडी नव्या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न करा
खासदार जगदीश शेट्टर यांची नैर्त्रुत्य रेल्वेकडे मागणी : वंदे भारतसह नव्या रेल्वे सुरू करा
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी नैर्त्रुत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. वंदे भारत एक्स्प्रेस विस्तारासोबत बेळगाव-धारवाड नवीन रेल्वेमार्गाच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बेळगावला कोकण रेल्वेला जोडण्यासाठी बेळगाव-सावंतवाडी, तसेच बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्ग सुरू करावा, असा सल्ला खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गासाठी भू-संपादन केले जात असून लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावपर्यंत विस्तार करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. सौंदत्ती रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू करण्याची सूचना त्यांनी केली. बेळगाव-मिरज-बेळगाव मार्गावरील पुशपुल पॅसेंजर कायमस्वरुपी करावी, हुबळी-कोचिवल्ली एक्स्प्रेसचा विस्तार बेळगावपर्यंत करावा, म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस घटप्रभा येथे थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर बेळगाव-पंढरपूर, हुबळी-बेळगाव-शिर्डी, बेळगाव-जोधपूर, बेळगाव-मुंबई अशा नवीन एक्स्प्रेस सुरू करून रेल्वेसेवा वाढविण्याची मागणी करण्यात आली. बेळगावजवळील देसूर रेल्वेस्थानकात रेल्वे पिटलाईन बांधण्याची मागणी त्यांनी केली.
बेळगाव-सावंतवाडी रेल्वेमार्ग गरजेचाच
बेळगावला रेल्वेद्वारे कोकणाला जोडण्यासाठी बेळगाव-सावंतवाडी रेल्वेमार्ग आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी या रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणही झाले होते. मागील महिन्यात या रेल्वेमार्गासाठी पुन्हा हालचाली गतिमान झाल्या आहेत. चंदगड तालुक्यातील नागरिकांनी कोल्हापूर व बेळगावच्या लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याकडे रेल्वेमार्गाची मागणी केली होती. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा केल्यास बेळगावहून कोकणात जाणे सोयीचे होणार आहे.