ट्रम्प यांच्या विजयावर शिक्कामोर्तबवृत्तसंस्था
वॉशिंग्टन
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मिळविलेल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. इलेक्टोरल व्होट्सच्या गणनेनंतर उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांना विजयी घोषित केले. ट्रम्प यांचा विजय 6 नोव्हेंबर रोजी निश्चित झाला होता, परंतु याची अधिकृत घोषणा आता झाली आहे. अमेरिकेची संसद कॅपिटल हिलमध्ये काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये इलेक्टोरल कॉलेजची मते मोजण्यात आली. ही प्रक्रिया उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्य अध्यक्षतेत पार पाडली, कारण त्या सिनेटच्या अध्यक्ष आहेत.
अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणूक झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी यात विजय मिळविला होता. ट्रम्प यांना एकूण 312 इलेक्टोरल व्होट्स मिळाली होती. तर त्यांच्या विरोधातील उमेदवार कमला हॅरिस यांना केवळ 226 इलेक्टोरल व्होट्स मिळाली होती. अध्यक्षीय निवडणुकीत विजयासाठी कुठल्याही उमेदवाराला 270 इलेक्टोरल व्होट्स प्राप्त कराव्या लागतात.
विजयाच्या अधिकृत घोषणेच्या 13 दिवसांनी म्हणजेच 20 जानेवारी रोजी ट्रम्प हे अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. चालू महिन्याच्या अखेरीस होणारे संयुक्त अधिवेशन आणि ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कॅपिटल हिलच्या चहुबाजूला कुंपण उभारण्यात आले असून सुरक्षेसाठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यांचे प्रतिनिधी मिळून करतात निवड
अमेरिकेत जनता इलेक्टर्स (राज्यांचे प्रतिनिधी) निवडते, हे इलेक्टर्स पॉप्युलर व्होट म्हणजेच जनतेच्या मतांच्या आधारावर निवडले जातात. जनता थेट अध्यक्षांसाठी मतदान करत नाहीत, तर स्वत:च्या राज्याच्या इलेक्टर्सकरता मतदान करतात. अनेक इलेक्टर्स मिळूनच इलेक्टोरल कॉलेज तयार होते. इलेक्टोरल कॉलेज अध्यक्ष निवडते. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत 538 इलेक्टर्स निवडले जातात. सर्व राज्यांमधून निवडून आलेल्या इलेक्टर्सची संख्या वेगवेगळी असते. अमेरिकेच्या निवडणुकीत ‘विनर टेक ऑल’ सिस्टीम काम करते. याचा अर्थ एखाद्या उमेदवाराला एका राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पॉप्युलर मते मिळाली तर त्या राज्यातील सर्व इलेक्टोरल व्होट संबंधित उमेदवाराला मिळाल्याचे मानले जाते.