युरोपियन युनियनसाठी ट्रम्प निती ठरणार डोकेदुखी
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रवादाचा मुद्दा उचलून धरत युवा मतदारांच्या मदतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद आपल्या पदरात पाडून घेतले. ट्रम्प यांच्या निवडीमुळे गेल्या चार वर्षातील धोरणांची दिशा आता उलट बाजूने फिरण्याची चिन्हे दिसू लागली. युक्रेन युद्धाला दिलेले आर्थिक पाठबळ, नाटोचे अर्थ साहाय्य आणि युरोपियन देशांबरोबर व्यापारावरील कर व्यवस्था बदलणाऱ्या धोरणाची दिशा ठरविणार आहे.
मित्र राष्ट्रांतही अनेक हेवेदावे असतात. ब्रेक्झिट हा मित्रराष्ट्रांमध्ये सुरु असलेल्या छुप्प्या युद्धाचा भाग होता. ब्रिटनला आपले चलन राखून ठेवायचे होते. तर युरोपियन युनियनला जागतिक बाजारपेठेत अमेरिकन डॉलरला भक्कम पर्याय उभा करायचा होता. अमेरिका हा युरोपियन युनियनचा एक विश्वासू भागिदार असल्याचे वरकरणी दिसून येते. मात्र गेले तीन महिने सुरु असलेल्या निवडणूक प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर भामटेपणाचे सरळ आरोप केले होते. युरोपियन युनियन अमेरिकेचा फायदा करून घेत असल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे.
अमेरिका आणि युरोप हे प्रगत तंत्रज्ञानात अग्रेसर असून ते एकमेकांचे स्पर्धक देश आहेत. युरोपमधील एअरबस आणि अमेरिकेची बोईंग विमान उत्पादक कंपनी, युरोफायटर आणि लॉकीड मार्टिन या लढाऊ विमान निर्मिती कंपन्यांची बाजारपेठेतील स्पर्धा एकमेकांमध्ये तिरस्कार निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे. त्याचा प्रत्यय अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाणीतून येत होता. चीन आणि भारत हे अमेरिकेसाठी शत्रू समान असून त्यांच्या विरोधातील ट्रम्प यांचा स्वर एकवेळ मान्य करता येतो. पण दुसऱ्या महायुद्धानंतर एकत्रितपणे वावरत असलेल्या युरोपियन युनियनला अशाप्रकारे भावी राष्ट्राध्यक्षांकडून पाहिले जात असल्याने पुढची चार वर्षे या मित्र राष्ट्रांमधील राजकारण पाहण्यायोग्य असेल.
उत्तर अटलांटिक देशांचा समुह म्हणजेच नाटो संघटना दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर साम्यवादी विचारसरणीच्या रशियाच्या हुकूमशहाने युरोपियन देशांना हादरवून सोडले. रशियाच्या पंखाखाली अनेक देशांना आपल्यात सामावून सोविएत युनियनची निर्मिती करण्यात स्टेलिन यांना यश मिळाले. रशियाच्या या आक्रमक अधिग्रहणाला शह देण्यासाठी दहा पंधरा युरोपियन देशांनी नाटो संघाची स्थापना केली. कालांतराने अमेरिकेसहीत अनेक देश या संघटनेत सहभागी झाले.
नाटो संघटनेच्या घटनेत सांघिक वृत्तीने आणि सहकार भावनेने काम करण्याचा संकल्प केलेला आहे. तसेच या संघटनेतील कोणत्याही एका सदस्य देशावर केलेला हल्ला हा नाटो संघटनेच्या सर्व सदस्य देशांवर केलेला हल्ला मानून तसे प्रत्यूत्तर देण्याची तरतूद घटनेत केलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक काळात नाटोमधील युरोपियन देशांवर दुगण्या डागलेल्या आहेत. नाटो संघटनेतील युरोपियन सदस्य अमेरिकेच्या निधीवर उ•dया मारत असल्याचा ठपका त्यांनी ठेवलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य युरोपियन देशांसाठी उपहासात्मक ठरत आहे. अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांचे अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्षपदावर असतानाही केल्याचा इतिहास आहे. यंदाच्या निवडणुकीत संघटनेतील प्रत्येक सदस्य देशांचा हिस्सा समान असायला हवा. तसेच अमेरिकन सैनिक युरोपातील विविध तळावर वसलेले असून त्यांना तेथून हटवून अमेरिकेच्या संरक्षणासाठी तैनात करणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलादोमीर झेलेन्स्की यांनी छेडलेल्या युद्धासाठी अमेरिकन करदात्यांचा भरमसाठ निधी वापरलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते हे युद्ध ताबडतोब थांबले पाहिजे. जेणेकरून अमेरिकन करदात्यांवर त्याचा अधिक बोजा पडू नये, यासाठी आपण प्रयत्नरत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. तसेच ट्रम्प यांचे समर्थक एलन मस्क यांनी युक्रेन सरकारने युद्धविराम करणे गरजेचे असून रशियाने जिंकलेले युक्रेनचे भूभाग रशियापाशी ठेवल्यास त्याचा चांगला परिणाम बाहेर येणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. ट्रम्प आणि ट़म्पचे सल्लागार हे झेलेन्स्की यांच्या महत्वाकांक्षेवर पाणी फेरणारे ठरत आहेत.
अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात अनेक अतिशयोक्त्या केलेल्या आहेत. यात अमेरिका आणि युरोप यांच्यातील व्यापारात 300 अब्ज डॉलर्सची तफावत असल्याचे सांगून युरोपियन देशांनी 20 टक्क्यांपर्यंत लादलेले कर कमी करण्याचा आग्रह ट्रम्प यांनी धरलेला आहे. अन्यथा युरोपियन युनियनचा व्यापार रोखणार असल्याचीही घोषणा केली होती. ट्रम्प यांच्या आकडेवारीचा मागोवा घेतल्यास युरोप आणि अमेरिकेमधील व्यापाराची 2023 मधील तूट 158 अब्ज डॉलर्स एवढी होती. आकडेवारी काहीही असली तरी अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यात व्यापारावरील कर आकारणीवरून घमासान होणार असून मित्र राष्ट्रांमधील ही रस्सीखेच मित्रत्वाची राहणार की दुष्मनीचा गंध येणार हे पुढील चार वर्षांत दिसून येणार आहे.
- प्रशांत कामत