ट्रम्पचा डाव अमेरिकेवरच उलटणार!
आपल्या मनाला वाटेल तसे निर्णय घेऊन अनेक राष्ट्रांना आपल्या तालावर नाचवू पाहत असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सध्या पावले तिरक्या दिशेने पडत असून त्यातून अमेरिकेच्या विरोधात चक्क युरोपियन राष्ट्रेही एकत्र येऊ लागली आहेत. अमेरिकेने गेल्या आठवड्यात व्हेनेझुएला या राष्ट्रावर केलेल्या हल्ल्यानंतर तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलास मादुरो यांना सपत्निक ताब्यात घेऊन अमेरिकेला नेले. यामुळे अनेक राष्ट्रांमध्ये खळबळ माजली. ते तेवढे करून राहिले नाहीत तर व्हेनेझुएला या राष्ट्रावर अंतरिम अध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रिक्स या महिलेची नियुक्ती केली. मुळात व्हेनेझुएला या राष्ट्रावर हल्ला करण्याची नेमकी कोणती गरज होती हे केवळ अमेरिकेलाच माहीत परंतु एखाद्या राष्ट्राच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करणे हे योग्य नाही. त्यातून अनेक प्रश्न उभे होत आहेत आणि जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटायला सुऊवात झाली आहे की काय! असा प्रश्न उपस्थित होतो. सध्या काही घटना अशा घडत आहेत की अमेरिका इराणवर देखील हल्ला करून पाहत आहे. आपल्यावरील हल्ला परतून लावण्यासाठी इराणने आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. व्हेनेझुएलाच्या घडामोडीनंतर अध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांनी चीन, रशिया, इराण आणि क्युबा या राष्ट्रांशी आर्थिक संबंध तोडून टाकू, असा इशारा दिला आहे. तसे झाले तरच अधिक तेल काढण्यासाठी परवानगी दिली जाईल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला दिला आहे. अमेरिकेचा संपूर्ण जगाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात असाव्यात, यासाठी प्रयत्न आहे. संपूर्ण जगात आज तेल आधारित अर्थव्यवस्था चालते. त्यामुळेच अमेरिका इतर सर्व राष्ट्रांना आपल्या हातचे बाहुले बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था बरीच खालावत चालली आहे. अशावेळी इतर राष्ट्रांचे महत्त्व कमी करण्यासाठी अमेरिका भारतासह अनेक राष्ट्रांवर कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नवे नियम लादत आहे. यातून आपला देश आर्थिक दृष्ट्या अधिक बलवान होईल आणि जे देश प्रगतीपथावर आहेत ते खाली जातील, त्याचा आसुरी आनंद डोनाल्ड ट्रम्प घेऊ पाहत आहेत. परंतु कोणत्याही गोष्टीला काही मर्यादा असतात. एकदा मर्यादा ओलांडायला लागली की मग स्थिती फार अडचणीची होऊन जाते. अमेरिकेची देखील गत अशीच होण्याची शक्यता आता वाढली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जे काही निर्णय घेत आहेत त्या निर्णयास खुद्द अमेरिकेतील राजकीय नेते तसेच बुद्धिजीवी मंडळी देखील विरोध करीत आहेत. मात्र आपला निर्णय हा अमेरिकेची अर्थस्थिती मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आहे, असे भासवून अमेरिकन नागरिकांवर मोहिनी टाकण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प हे करीत आहेत. अमेरिकेचे अंतर्गत काही प्रश्न असू शकतात परंतु जगाला वेठीस धरण्याचा प्रयत्न हा निश्चितच ट्रम्प यांना भविष्यात अडचणीचा ठरणार आहे. व्हेनेझुएला नंतर इराण तसेच इतर काही राष्ट्रे अमेरिकेच्या रडारवर आहेत. व्हेनेझुएला या देशामध्ये जे तेल निर्माण होते त्यातील मोठ्या प्रमाणात तेल चीन खरेदी करते. त्यामुळेच या देशाने आपल्याशी भागीदारी करावी आणि चीन, क्युबा, रशिया, इराण इत्यादी राष्ट्रांशी संबंध तोडून टाकावे असा आग्रह डोनाल्ड ट्रम्प यांनी धरलेला आहे. त्यातून अनेक प्रश्न जागतिक पातळीवर निर्माण होऊ लागलेले आहेत. एका बाजूने व्हेनेझुएला आपल्या ताब्यात घेतले आणि आता डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश असलेला ग्रीनलँड हा भागही अमेरिका आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. याच अनुषंगाने अमेरिकेने जाहीर घोषणा केलेली आहे. ग्रीनलँड केवळ 54000 नागरिक असलेला एक छोटासा देश. नाटो या अंतर्गत हा देश येत असल्याने व अमेरिका या राष्ट्रावर कब्जा करण्यासाठी हल्ला करू पाहत आहे, तसे झाल्यास, नाटोचे अस्तित्व देखील आणि त्याची संपूर्ण यंत्रणा संपुष्टात येऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने अनेक देशांना धमक्या देण्याचे सत्र सध्या सुरू केलेले आहे, त्यामुळे फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, इंग्लंड तसेच इतर काही राष्ट्रे आता एकत्र येऊ लागली आहेत आणि त्यांनी अमेरिकेवरचे आपले संबंध कमी करण्याचा विचार चालविला आहे. वास्तविक सर्व राष्ट्रांनी निर्णय घेऊन अमेरिकेचा डॉलर स्वीकारायचे नाही, असे ठरविले तर अमेरिकेची शक्ती कमी होऊ शकते परंतु तसा निर्णय घेण्याचे धाडस सहसा कोणी दाखवीत नाही. अनेक राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये फूट पाडून ट्रम्प प्रशासन ताबा घेऊ पाहत आहे. अनेक राष्ट्रे आता हळूहळू अमेरिकेच्या विरोधात एकत्र येण्याने अमेरिकेचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते. प्रगती ही थोपवू शकत नाही. केवळ अमेरिकाच प्रगती करू शकतो इतर राष्ट्रांच्या मनगटात तेवढी ताकद नाही, असे दाखवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता वाढली आहे. मात्र हे करत असताना तिसरे महायुद्ध होणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. एका डोनाल्ड ट्रम्पच्या वागणुकीमुळे अनेक राष्ट्रांना अकारण फटका बसत आहे. युरोपियन राष्ट्रांनी हळूहळू एकत्र येऊन अमेरिकेच्या या धोरणास जो विरोध सुरू केलेला आहे त्यातून नेमके काय निष्पन्न होईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. अमेरिकेने मात्र लवकरच अशा पद्धतीचा संदेश दिला आहे आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय ध्वजावर ग्रीनलँडच्या ध्वजाचा छोटा फोटो दाखवून ग्रीनलँड लवकरच आपल्या ताब्यात येईल अशा पद्धतीची मर्दुमकी गाजविण्याचा प्रयत्न चालू केला आहे. ट्रम्प यांनी नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी
ऑर्गनायझेशन ही संस्था संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. युरोप आणि रशिया या दरम्यान लष्करी आणि क्षेपणास्त्राच्या निगराणीसाठी ग्रीनलँड हे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. अमेरिकेने जो निर्णय घेण्याचा इरादा व्यक्त केला आहे त्यामुळे चीन आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांचे त्यावर लक्ष आहे. ही दोन्ही राष्ट्रे उद्या एकत्र आली तर अमेरिकेला एक मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. अमेरिकेचे ट्रम्प हे सध्या फारच अस्वस्थ दिसत आहेत मात्र त्यांच्या एकंदरीत वागणुकीमुळे तिसऱ्या महायुद्धाला कुठेतरी वाट मोकळी करून देण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट होतोय. युरोपियन राष्ट्रे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मनात काहीतरी गंभीर खलबते चालू आहेत हे नेहमीच लक्षात ठेवणे आवश्यक असते. ट्रम्प यांचे वागणे हास्यास्पद ठरत आहे, मात्र अमेरिकेने अनेक वर्षांमध्ये मिळवलेली पत हे राष्ट्र ट्रम्प यांच्या वागण्यामुळे गमावून बसण्याची शक्यता वाढली आहे. अनेक राष्ट्रांना आपल्या ताब्यात घेण्याची इच्छा बाळगलेल्या ट्रम्पला त्याचबरोबर अमेरिकेला देखील भविष्यकाळात अनेक संकटांना देखील तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. विक्षिप्त पद्धतीने घेतलेले निर्णय हे किती अडचणीचे ठरू शकतात हे आता यानंतर दिसून येतील. मात्र अमेरिका स्वत:च्या समस्या वाढून घेण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल निश्चितच करीत आहे, हे सत्य आहे.