ट्रम्प यांचा गोल्फ क्रीडांगणावर - रणांगणावर
गोल्फच्या क्रीडांगणावर आणि राजकारणाच्या रणांगणावर ट्रम्प हे एक वादळ आहे आणि हे वादळ आता अमेरिकेभोवती आणि जगाभोवती सतत 4 वर्षे घोंघावत राहणार आहे. पहिल्या तीन महिन्यात जगाने व अमेरिकेने या वादळाची चुणूक पाहिली आहे. आता हा गोल्फचा खेळ ट्रम्प कसा यशस्वी करतात ते पहावयाचे आहे.
आजवर अमेरिकेच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या चार अध्यक्षांनी जशी गोल्फमध्ये यश शिखरावर तेजस्वी कामगिरी बजावली आहे तशीच त्यांनी अध्यक्षीय कारकीर्दही चमकदारपणे नोंदविली आहे. इतिहासात नवे पान लिहिणारे ड्वाइट आयसेनहॉवर असोत की, रिचर्ड निक्सन असोत किंवा बराक ओबामा असोत की, आताचे दुसऱ्यांदा निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प असोत या चारही अध्यक्षांनी गोल्फ खेळून अमेरिकन मतदारांची मने जिंकली, मतेही जिंकली आणि इतिहास घडविला. यापैकी आयसेनहॉवर हे लष्करी नौदलातील श्रेष्ठ अधिकारी होते. यश शिखरावर असताना त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि ते अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी अमेरिकेमध्ये प्रभावी असे रस्त्यांचे जाळे निर्माण केले. त्यांनी साम्यवादाच्या विरोधातील धोरणाला नवी गती दिली. तसेच महासत्ता या शांततेचे स्तंभ आहेत आणि युद्धे घडवू शकतात आणि युद्धे थांबवूही शकतात असा सिद्धांत मांडणारे रिचर्ड निक्सन हे शांततेचा संदेश घेऊन थेट मॉस्कोला पोहोचणारे पहिले अध्यक्ष होते. तेही गोल्फचे मोठे शौकीन होते.
तसेच दहशतवाद निपटून काढणारे बराक ओबामा यांनी अत्यंत गोपनीय कारवाई करून ओसामा बिन लादेन यांची पाकिस्तानातील अबोटाबाद येथून मध्यरात्री थेट जन्नतमध्ये रवानगी केली. त्याला पकडले आणि उत्तर अरेबियन सागरात सोडून दिले आणि दुसऱ्या दिवशी अमेरिकन चित्रवाणीवर केलेल्या भाषणात आम्ही दहशतवादाचे समूळ उच्चाटन केले, दिलेले आश्वासन पूर्ण केले अशी गर्जनाही केली होती. मॅगा म्हणजे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असा नारा देऊन अमेरिकेला पुन्हा सुवर्णयुगात घेऊन जाण्याचे स्वप्न दाखविणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या कारकीर्दीत सुद्धा गोल्फचा खेळ करून उत्तम इतिहास घडविला आहे. दुसऱ्या कारकीर्दीचा 70 दिवसांचा काळ संपत आहे. तिसऱ्या महिन्याचा कालावधी सुरू झाला आहे. या काळात ट्रम्प यांनी केलेल्या कामगिरीचा हा लेखाजोखा आहे.
गोल्फचा रंजक इतिहास?- ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधूनही सापडत नाही तसेच खेळाच्या इतिहासाचेही असते. गोल्फ खेळ कुठे, कसा व केव्हा सुरू झाला याबाबत अनेक सिद्धांत आहेत. नदीकाठी, समुद्रकिनारी जेथे मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध आहे अशा ठिकाणी हिरवेगार
लॉन निर्माण करून तेथे गोल्फ मैदान तयार केले जाते. 18 होल्स किंवा छिद्रे मैदानावर असतात. कमीत कमी स्ट्रोक्सचा उपयोग करून चेंडू या छिद्रामध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. बॉल, ग्लोव्हज् आणि टीशर्ट एवढीच काय ती या खेळाची तीन उपकरणे. 1900 सालापासून गोल्फला ऑलिंपिकमध्ये प्रवेश देण्यात आला आणि गोल्फची लोकमान्यता आणि राजमान्यता वाढली. रोमन इतिहासकारांचा प्रवाह असे मानतो की, गोल्फची सुरूवात तेथे पॅगानिका खेळापासून झाली. चामड्याच्या चेंडूला मारण्यासाठी वाकड्या काठीचा उपयोग खेळाडू करीत असत. इ.स. च्या पहिल्या शतकात रोमन साम्राज्याने सगळा युरोप व्यापला व त्याबरोबरच पॅगानिका खेळाचाही प्रसार झाला. प्राचीन काळात हा खेळ चीनमध्ये च्युइवान म्हणून ओळखला जात असे. त्याचा अर्थ चुई म्हणजे मारणे आणि वान म्हणजे लहान चेंडू असा होतो. ही व्युत्पत्ती गोल्फच्या जन्माची कथा सांगते.
मध्ययुगातील चार शतकात चीनमध्ये या खेळाचा गतीने विकास झाला. तेथील सम्राट झुआंडे हा च्युइवान वाजविताना एक चित्र उपलब्ध आहे. 1368 मध्ये युकिउ यांनी लिहिलेल्या ‘द ऑटम बँक्वेट’ या ग्रंथात त्यांनी मिंग राजवटीचा इतिहास दिला आहे. या चिनी खेळाचे साधर्म्य गोल्फशी आहे असा त्यांचा दावा आहे. भारतीय तत्त्वज्ञ आणि यादव नृपती भगवान श्रीकृष्णांनी लगोरी हा खेळ खेळल्याची नोंद सापडते. त्याला लिंगोरच्या असेही म्हटले जाते. 7 छिद्रांचा आणि छोट्या चेंडूने खेळला जाणारा हा खेळ म्हणजे महाभारत युगातील गोल्फच म्हटला पाहिजे. गोल्फमध्ये जशी 18 महत्त्वाची छिद्रे असतात व त्यामध्ये चेंडू पोहोचवायचा असतो त्याप्रमाणे लगोरीची रचना सुद्धा गोल्फशी साधर्म्य साधणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या मालिकेत लगोरी खेळावर विशेष प्रकाश टाकला होता. गोल्फमध्ये 9-9 म्हणजे 18 छिद्रे किंवा होल्स असतात. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने खेळलेल्या लगोरीमध्ये सुद्धा 2 कमी म्हणजे 7-7 छिद्रे होती. प्राचीन भारतामध्ये महाकाव्यात दिसणारे लगोरीचे संदर्भ आणि प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी खेळलेला हा खेळ जणू त्या काळातील गोल्फचे एक प्रभावी रुप होता असे म्हणावे लागेल. प्राचीन चिनी संस्कृतीप्रमाणे भारतामध्ये सुद्धा गोल्फसारखा खेळ होता ही गोष्ट प्रामुख्याने नमूद केली पाहिजे.
मध्ययुगाच्या प्रारंभी इंग्लंडमध्ये कंबुका आणि फ्रान्समध्ये चॅम्बोट म्हणून हा खेळ ओळखला जातो. पोलो, कोल्व्हेन अशी त्याची अनेकविध रुपे होती. कोल्व्हेन हा तर खेळ आजच्यासारख्या वक्र बॅटने खेळला जातो. नेदरलँडमध्ये 1297 पासून लोएनेन येथे या खेळाचा उत्सव भरविला जातो. स्कॉटलंडमध्ये जेम्स दुसरा या राजाने तिरंदाजीमध्ये अडथळा येतो म्हणून या खेळावर काही काळ बंदी घालण्याचा चमत्कारही केला होता. परंतु खऱ्या गोल्फचा विकास झाला तो स्कॉटलंड या देशातच. 1764 साली स्कॉटलंडमध्ये सेंट अँड्रयूज या शहरात गोल्फ कोर्स स्थापन करण्यात आले. 1895 पासून हे ठिकाण त्याच्या नावाचा डंका वाजवित आहे, झेंडा फडकवित आहे. स्कॉटलंडमधील पूर्व लोथियन येथील मुसेलबर्ग लिंक्स येथे 2 मार्च 1672 पासून गोल्फ खेळला जात असल्याचे दस्तऐवजीकरण केले जाते, ज्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात जुने गोल्फ कोर्स म्हणून प्रमाणित केले आहे.
डोनाल्डचे गोल्फ प्रेम?- डोनाल्ड ट्रम्प आणि गोल्फ यांचे जणू काही अतूट नाते आहे. खरेतर, 1964 साली फोर्डहॅम विद्यापीठात काही काळ पदवीचे शिक्षण घेत असताना ट्रम्प यांना गोल्फ खेळाची गोडी निर्माण झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी गोल्फची ही आवड मोठ्या आस्थेने जोपासली आहे. आपल्या भावाचा मद्यपानामुळे झालेला मृत्यू पाहून ट्रम्प यांनी आपले आयुष्य चांगल्या छंदामध्ये व्यतीत करण्यासाठी गोल्फ खेळाशी नाते जोडले आणि ते नाते त्यांनी आजपर्यंत मोठ्या स्नेहाने जपले आहे. 1999 साली रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून ट्रम्प यांनी गोल्फ कोर्स खरेदी करण्याचा आणि त्यांची पुनर्बांधणी करण्याचा सपाटा लावला. अमेरिकेत आणि जगात चांगली गोल्फ मैदाने असावीत हे त्यांचे स्वप्न होते. ट्रम्प होल्डींग, ट्रम्प ऑर्गनायझेशन या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या हिकमतीने जगभरामध्ये 17 गोल्फ कोर्स मैदाने बांधली, उभारली आणि त्यांचे संगोपनही केले. ट्रम्प यांनी गोल्फ खेळाच्या स्पर्धांचे व्यावसायिक पातळीवर तसेच महिलांसाठी स्वतंत्र आयोजन केले. दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ट्रम्प यांनी गोल्फ कोर्स उभारण्यात गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला कारण त्यांच्या या प्रकारच्या बांधकामामुळे नैतिकतेचा प्रश्न येतो आणि संविधानाचे उल्लंघन होते अशी टीका करणारे काही खटले त्यांच्यावर दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच म्हटला पाहिजे.
ट्रम्प यांच्या गोल्फ प्रेमाची पावती अनेक मान्यवरांनी दिली आहे. जॅक निकलॉसच्या मते, ट्रम्प यांचा पैशापेक्षाही गोल्फवर अधिक जीव आहे. गोल्फ डायजेस्टच्या मते, त्यांचे अपंगत्व या खेळावरील प्रेमामुळे 2.8 टक्क्यांनी कमी झाले आहे. प्रसिद्ध क्रीडा लेखक रिक रॅली यांनी लिहिलेल्या ‘कमांडर इन चीट’ या ग्रंथामध्ये हा अपंगत्वाचा दावा खोडला आहे. ट्रम्प यांचे गोल्फ प्रेम अध्यक्ष व्हावे म्हणून आहे असे नाही. 2005 साली ट्रम्प यांनी लिहिलेल्या ‘द बेस्ट गोल्फ अॅडव्हाइस आय एव्हर रिसिव्ह्ड’ या ग्रंथात त्यांनी आपल्या गोल्फ प्रेमाची कहाणी रंगविली आहे. ते असे नमूद करतात की, माझ्यासाठी आणि जगभरातील लाखो पुरुष, महिला, तरुण, वृद्ध या सर्वांसाठी गोल्फ हा एक छंद आहे. ती एक आवड आहे.
(पूर्वार्ध)
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर