ट्रम्प यांचा गोल्फ क्रीडांगणावर आणि रणांगणावर
उत्तरार्ध
मासले गोल्फ राजकारणाचे?- ट्रम्प यांच्या गोल्फ राजनीतिचे काही उत्कृष्ट नमुने लक्षणीय आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी त्यांच्याबरोबर 5 वेळा गोल्फ खेळण्याचा दाखला दिला आहे. ज्या अमेरिकेने हिरोशिमा येथे 1945 साली दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब टाकले होते त्या जपानशी गोल्फ खेळून उभय राष्ट्रातील मैत्रीचा नवा आदर्श ट्रम्प यांनी प्रस्थापित केला. 2024 मध्ये ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झाले आणि त्यांच्या गोल्फ प्रेमाची वाहवा जगभर सुरू झाली. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक योल यांनी सुद्धा आपल्या प्रतिमा निर्मितीसाठी गोल्फ खेळण्यास सुरूवात केल्याचा दाखला आहे. शिंजो आबे, मार्क कोलबर्ग यासारखे त्यांचे जागतिक गोल्फ मित्र नोंदविले जातात. फ्लोरिडातील वेस्ट पाम बीचवरील त्यांनी उभारलेला गोल्फ कोर्स मोठा नामांकित आणि प्रेक्षणीय आहे. मार-ए-लागो हा फ्लोरिडातील रिसॉर्ट आणि गोल्फ कोर्स हे ट्रम्प यांची वैशिष्ट्यापूर्ण अद्भुत कामगिरी आहे. तेथे ते आपल्या शिंजो आबे सारख्या राजकीय मित्रांना घेऊन जात असत आणि त्यांचा पाहुणचारही करीत असत. 2004 पर्यंत ट्रम्प यांनी 4 गोल्फ कोर्सवर अमेरिकेत आपले नाव कोरले होते. गोल्फची प्रतिके घेऊन ट्रम्प जेव्हा प्रतिपक्षावर टीकेची झोड उठवितात तेव्हा मोठी गंमत होते. पण ती ट्रम्प यांची खासियत आहे. त्यांचे गोल्फ खेळतानाचे व्हिडिओ कमालीचे लोकप्रिय आहेत. ट्रम्प यांनी ब्रायसनसोबत गोल्फ खेळल्याचा 18 तासांचा व्हिडिओ मोठा अद्भुत व रोमांचक आहे. आघाडीच्या गोल्फ पटूबरोबर मुकाबला करून ट्रम्प यांनी आपली कौशल्ये जगासमोर ठेवली. गोल्फ प्रेमापोटी ट्रम्प यांनी टीकेचे फटकारेही सोसले आहेत. 2000 नंतरच्या दोन दशकात त्यांनी गोल्फ कोर्स उभारण्यासाठी केलेल्या खर्चातून त्यांना 315 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढा कर भरावा लागला आहे. 1999 ते 2017 पर्यंत पोर्तो रिको पासून ते दुबईपर्यंत ट्रम्प यांनी जगातील अनेक देशात गोल्फ कोर्स उभारली.
अध्यक्ष आणि गोल्फ स्ट्रोक्स?- आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यक्षीय कारकीर्दीत ट्रम्प यांनी गोल्फचा छंद तेवढाच जोपासला आणि तेवढेच स्ट्रोक्सही मारले. पहिल्या कारकीर्दीच्या प्रारंभी ट्रम्प यांनी म्हटले होते ‘मला तुमच्यासाठी काम करावयाचे आहे. मला गोल्फ खेळण्यासाठी वेळ मिळणार नाही.’ पण त्यांचे गोल्फ प्रेम ऊतू आले. सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्या आठ आठवड्यात 11 वेळा गोल्फ खेळल्याची नोंद आहे. ओबामा यांनी पहिल्या आठ आठवड्यात एकदाही गोल्फ खेळला नव्हता. आपल्या दोन कार्यकाळात ओबामा 306 फेऱ्या गोल्फ खेळले होते. पदावर असताना ठळक प्रमाणात गोल्फ खेळणारे अध्यक्ष म्हणून ओबामा ओळखले जातात. पहिल्या कार्यकाळात 1461 दिवसांपैकी सुमारे 428 दिवस ट्रम्प गोल्फ खेळले. ट्रम्प ऑर्गनायझेशनने म्हटले की, अध्यक्ष महोदयांनी पहिल्या कार्यकाळात 261 फेऱ्यांमध्ये गोल्फ खेळण्याचा विक्रम केला. सीएनएन वृत्तसंस्थेच्या मते, 2017-18 वर्षात ट्रम्प यांनी 91 वेळा गोल्फ कोर्सला भेट दिली. ओबामा 12-13 दिवसांनी एकदा गोल्फ खेळत तर ट्रम्प दर 5 दिवसांनी गोल्फ खेळत असे
वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. ट्रम्प यांच्या वारंवार कोर्सला भेटी देण्याच्या घटनांवरून पत्रकारांनी नैतिकतेच्या मुद्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पण त्याची पर्वा ट्रम्प यांनी कधीच केली नाही. दुसऱ्या अध्यक्ष काळात त्यांची कामगिरी आणि त्यांचे गोल्फ प्रेम जसे गडदपणे प्रकटले तसे ते वादाचा विषय ठरले.
पुन्हा एकदा गोल्फ?- 2024 च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांना स्पर्धेतून आऊट केले आणि त्यानंतर कमला हॅरिस यांनाही धूळ चारली. त्यांचा विक्रमी विजय म्हणजे गोल्फचा खेळच म्हटला पाहिजे. 27 जून 2024 रोजी झालेल्या डिबेटमध्ये त्यांनी गोल्फ क्षमतेवरून बायडेन यांना मागे टाकून आपले वर्चस्व सिद्ध केले. या डिबेटनंतर बायडेन हे स्पर्धेतून मागे पडले आणि त्यांच्या पक्षाने त्यांची उमेदवारी काढून घेतली हाही ट्रम्प यांचा एक गोल्फच म्हटला पाहिजे. 15 सप्टेंबर 2024 रोजी फ्लोरिडा येथे गोल्फ मैदानावर खेळाचा सराव करीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी लपून बसलेला रायन वेस्ली राउथ हा दहशतवादी त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. परंतु ट्रम्प बाल बाल बचावले. 20 जानेवारी 2025 रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकानंतर एक गोल्फ खेळाप्रमाणेच ट्रम्प यांनी विक्रम सुरू केले. नियोजन, आक्रमकता आणि अचूक निर्णय हे तीन गुण गोल्फ खेळातून येतात. ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी मेक्सिकोच्या सीमेवर आणीबाणी जाहीर केली. कॅनडावरही जकात कर लावला आणि अमेरिकेला सुवर्णयुगात घेऊन जाण्याची हमी दिली. त्यांनी घेतलेले प्रमुख निर्णय हे 18 छिद्रांपैकी कमीत कमी छिद्रात प्रवेश करून विजय मिळविण्याचा विक्रम म्हटला पाहिजे. मेक्सिकोतील आणीबाणी, रशिया-युक्रेन आणि हमास-इस्त्राईल युद्धबंदी आणि अमेरिकेला अनुकूल अशा जकात करांचा निर्णय यामुळे त्यांचा राजकीय गोल्फ खेळ रंगत गेला. वादळेही झाली, वादही झाले पण गोल्फमध्ये प्रतिपक्षावर आक्रमण करताना कमी वेळात धाडसी निर्णय घेऊन खेळाचे चित्र बदलून टाकावे तसाच विक्रम त्यांनी राजकारणाच्या गोल्फ मैदानावरही केला आहे. आवडीच्या खेळातून व्यक्तिमत्त्व घडते आणि या व्यक्तिमत्त्वातून महत्त्वाचे निर्णय राजकारणात घेतले जातात. ट्रम्प हे गोल्फ खेळाडू नसते तर दुसऱ्यावेळी त्यांच्या राजकारणात एवढी सफलता प्राप्त झाली नसती असे म्हणावे लागेल.
समारोप-ट्रम्प महोदय हे गोल्फ या खेळाशी एकरुप झाले आहेत. राजकारणातील चढउताराप्रमाणेच त्यांनी आपला गोल्फचा खेळसुद्धा रंगविला आहे. जगाच्या राजकारणात शांतता व स्थैर्य आणण्यासाठी त्यांनी पूर्वीची सर्व समीकरणे बदलून टाकली. नाटोमधून ते बाहेर पडल्यासारखीच अवस्था आहे आणि आता अमेरिका विना युरोपला स्वत:चे अस्तित्व विकसित करावे लागत आहे. शिवाय त्यांनी उपस्थित केलेला ग्रीनलँडचा मुद्दा असो की पॅलेस्टाईन क्षेत्रात रिव्हीएरा किंवा प्रासाद उभारण्याचा त्यांचा निर्णय असो यामुळे वाद झाले, वादळे झाली पण ट्रम्प कुशल गोल्फ खेळाडूप्रमाणे आपले निर्णय व आपले यश प्रस्थापित करताना निश्चयी राहिले आहेत. राजकारणातील चढउतार हे खेळाप्रमाणे असतात आणि खेळाची निर्णयक्षमता ही राजकारणात निर्णय घेण्यासाठी सुद्धा प्रेरक असते या दृष्टीने ट्रम्प यांनी आजवर तीन महिन्यात चालविलेला हा राजकारणातील गोल्फचा खेळ त्यांच्या बाजूने निर्णायक ठरला आहे. पुढील चार वर्षाच्या काळात आपला गोल्फ खेळ राजकीयदृष्ट्या ट्रम्प जगाच्या मैदानावर कसा खेळतात यावर त्यांचे यश अवलंबून आहे. तूर्त तरी तीन महिन्यात ट्रम्प बरेच आक्रमक, बरेच सावध आणि बरेच निर्णय फिरवणारेही ठरले आहेत. त्यांनी कॅनडा व मेक्सिकोवर लादलेला टॅरिफ कर एक महिन्यासाठी मागे घेतला आणि धक्का दिला. अशाप्रकारे अनेक धक्का देणारे निर्णय घेणे आणि निर्णय कधी कधी कुशलतेने मागे घेणे ही सुद्धा त्यांची एक खास शैली आहे. ते जसे बोलतात तसे खेळतात, जसे खेळतात तसे राजकारणही करतात. त्यामुळे राजकारणातील त्यांची आक्रमकता ही त्यांनी गोल्फमधून घेतली आहे असे म्हणावे लागेल.
अध्यक्ष पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांनी 7 वेळा गोल्फ दौरे केले असे म्हटले जाते. त्यांच्या गोल्फ आऊटींगवर 23 दशलक्ष पेक्षा अधिक खर्च झाला असे गार्डीयन पत्राने नमूद केले आहे. गोल्फ करार मिळविण्यासाठी ते अध्यक्ष पदाचा वापर करीत आहेत का असा प्रश्नही विचारला जात आहे. पण त्याची उत्तरे तूर्तास देता येणार नाहीत. वादळात राहणे आणि वादळातून बाहेर पडणे हा ट्रम्प यांचा स्वभाव धर्म आहे. गोल्फ खेळातील नीतिप्रमाणेच ते आक्रमक व्यूहरचना करतात, वादळे निर्माण करतात आणि त्यातून बाहेरही पडतात ही त्यांची खासियत आहे. 2024 मध्ये ट्रम्प यांचे गोल्फ संबंधित उत्पन्न 267 दशलक्ष एवढे होते. त्यांचे व्यावसायिक आणि राजकीय हितसंबंध एकमेकांना छेदतात पण त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांना ते समर्थपणे सामोरेही जातात हे त्यांचे वेगळेपण आहे. ट्रम्प यांनी आपली नवी टीम निवडताना केलेली माणसांची पारख ही त्यांच्या गोल्फ खेळातून जन्माला आली आहे. कुठल्याही निर्णयाची पूर्वतयारी, त्यातील निवेदन आणि त्याचा प्रभाव या गोष्टी सुद्धा त्यांच्या गोल्फ व्यक्तिमत्त्वाचे द्योतक आहेत.
अमेरिकेचे अध्यक्षपद हे जगात सर्वात श्रेष्ठ आणि बलशाली मानले जाते कारण राज्य करण्याचा अधिकार आणि शासन चालविण्याचा अधिकार असे दोन्ही अधिकार तेथे केंद्रित झालेले असतात. याबाबतीत थोडे गोल्फचे नाते समजून घेतले पाहिजे. अमेरिकेच्या इतिहासात कार्यकारी नेतृत्वाच्या विकासासाठी गोल्फ हे एक साधन बनले आहे. गोल्फमधील अचूक भेदनीतिमुळे एखाद्याची एकाग्रता वाढते, निष्ठा वाढते, हेच ट्रम्प यांनी साध्य केले आहे. गोल्फ माणसाच्या चारित्र्याला आणि त्याच्या सर्वात संपन्न गुणांना जोड देतो ती संयम आणि संतुलनाची. व्यावसायिकतेमध्ये लक्ष केंद्रित करणे, संयम आणि संतुलन राखणे, माणसांची पारख करणे हे गुण विकसित करणारा हा खेळ आहे. या गंभीर पुनरावलोकनाचा संदेश असा आहे की, ट्रम्प यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करताना गोल्फमधून घेतलेली मूल्यप्रेरणा ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव बनली आहे. त्यामुळेच अमेरिकेला पुन्हा सुवर्णयुगात नेण्याची आणि जगात शांतता प्रस्थापित करण्याची हमी ते देत आहेत. गोल्फ खेळा आणि राजकारण करा, तुम्ही यशस्वी व्हाल असा प्रमुख राष्ट्राध्यक्षांच्या जीवनाचा संदेश आहे. किंबहुना ट्रम्प यांच्या गोल्फ राजकारणाचा हाच अंतिम सार होय.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर