व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प-झेलेन्स्की भेट
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले होते. रशिया-युक्रेन युद्धाचे भविष्य ठरवणारी ही बैठक एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध सोडवण्यासाठी आणि अमेरिका-युक्रेन संबंधांना एक नवीन आयाम देण्यासाठी ही बैठक खूप महत्त्वाची ठरू शकते.
सत्तेत परतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी ही पहिलीच भेट आहे. या भेटीचा जागतिक राजकारणावर परिणाम होऊ शकतो. ही बैठक केवळ दोन्ही देशांमधील संबंधांपुरती मर्यादित राहणार नाही तर जागतिक संतुलनही बदलू शकते, असे मानले जाते. या बैठकीत युक्रेनला अमेरिकेची मदत, सुरक्षा हमी, रशियासोबतचा संभाव्य शांतता करार आणि एका मोठ्या खनिज करारावर चर्चा झाल्याचे समजते.