न्यू हॅम्पशायर प्रायमरीत ट्रम्प विजयी
भारतीय वंशाच्या निक्की हेली यांचा पराभव : बिडेन यांचे टेन्शन वाढले
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू हॅम्पशायर येथे रिपब्लिकन पार्टीच्या प्रायमरी निवडणुकीत मोठा विजय मिळविला आहे. रिपब्लिकन पार्टीकडून अध्यक्षीय पदाच्या शर्यतीत सामील भारतीय वंशाच्या निक्की हेली यांचा त्यांनी पराभव केला आहे. निक्की हेली यांनी आपण हार मानणार नसल्याचे या पराभवानंतर बोलताना म्ह्टले आहे. प्रायमरी निवडणुकीत विजयामुळे ट्रम्प हे आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार होण्याचा मार्ग अधिकच मोकळा झाला आहे.
ही लढाई अद्याप संपलेली नाही असे म्हणत निक्की हेली यांनी अद्याप आपण लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यू हॅम्पशायरच्या निवडणुकीत ट्रम्प यांना 55 टक्के तर हेली यांना 43 टक्के मते मिळाली आहेत. निक्की हेली यांनी येथे अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मानणे आहे. रिपब्लिकन पार्टीत ट्रम्प यांच्यासमोर आता केवळ निक्की हेली यांचे आव्हान आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वी आयोवा कॉकसमध्ये विजय मिळविला होता. न्यू हॅम्पशायर येथील विजय हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी निर्णायक आहे. दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर हेली यांनी या शर्यतीतून बाजूला होण्याची हीच योग्य वेळ असल्याचे उद्गार विवेक रामास्वामी यांनी काढले आहेत. तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या या विजयामुळे अध्यक्ष जो बिडेन यांच्यासमोरील आव्हान तीव्र झाले आहे. अध्यक्षीय निवडणुकीत आता त्यांना मोठे आव्हान मिळणार असल्याचे मानले जात आहे.