कोलोराडोतून ट्रम्पना लढविता येणार नाही निवडणूक
संसद हिंसेसाठी जबाबदार असल्याची न्यायालयाची टिप्पणी
वृत्तसंस्था / कोलोराडो
अमेरिकेतील प्रांत कोलोराडोच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी अध्यक्ष डोनाल्ड टमप यांना निवडणूक लढविण्यासाठी अपात्र घोषित केले आहे. यामुळे ट्रम्प यांचे नाव आता कोलोराडोमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या मतपत्रिकेवर लिहिले जाणार नाही. म्हणजेच रिपब्लिकन पार्टीचे नेते आता ट्रम्प यांना मत देऊ शकणार नाहीत. याचा थेट प्रभाव 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना मिळणाऱ्या मतांवर पडणार आहे.
हा निर्णय केवळ कोलोराडो प्रांतातच लागू होणार आहे. या निर्णयावर दाद मागण्याची मुभा असल्याने तो 4 जानेवारीपर्यंत स्थगित असणार आहे. न्यायालयाने ट्रम्प यांना 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या युएस कॅपिटल हिल हिंसेसाठी जबाबदार मानले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामागे अध्यक्ष जो बिडेन यांचा हात असून याच्या विरोधात अमेरिकेच्या मुख्य सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
पहिल्यांदाच घडली अशी घटना
ट्रम्प यांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय अमेरिकेच्या घटनेंतर्गत देण्यात आला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अध्यक्षीय पदाच्या उमेदवाराला अपात्र ठरविण्यात आले आहे. ट्रम्प यांना 4 जानेवारीपर्यंत कोलोराडो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येणार आहे. यानंतर याप्रकरणी सुनावणी करावी की नाही याचा निर्णय अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. अमेरिकेत 50 प्रांत असून प्रत्येक पांतात एक टॉप कोर्ट (स्टेट सुप्रीम कोर्ट) आहे. याचबरोबर देशाचे एक मुख्य सर्वोच्च न्यायालय आहे.
बिडेन यांना जॉर्ज सोरोस यांची साथ
निवडणुकीत अडथळे निर्माण करण्याच्या बिडेन यांच्या योजनेला जॉर्ज सोरोस यांचे समर्थन प्राप्त आहे. सोरोस हे रुढिवादी विरोधी विचारांचा प्रसार करण्यासाठी बिडेन यांना मदत करत आहेत. याचबरोबर ते बॉर्डर एन्फोर्समेंट संपुष्टात आणण्यासाठी बिडेन प्रशासनाला निधी पुरवत असल्याचा आरोप ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने केला आहे.