For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हाइट हाउसकडून ‘ट्रम्प टीव्ही’ लाँच

06:15 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हाइट हाउसकडून ‘ट्रम्प टीव्ही’ लाँच
Advertisement

अमेरिकेच्या वाहिन्यांनी रोखले ट्रम्प यांचे थेट प्रसारण : 3 प्रसारमाध्यमांवरील बंदीची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेतील दिग्गज टीव्ही वाहिन्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमांचे थेट प्रसारण संयुक्तपणे रोखले आहे. व्हाइट हाउसकडून सीएनएन, एमएस नाऊ आणि पॉलिटिको यांच्या पत्रकारांवर बंदी घालण्यात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता नव्या व्यवस्थेच्या अंतर्गत अध्यक्षांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओ कव्हरेज करण्यात येणार नसल्याचे वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. यानंतर व्हाइट हाउसने स्वत:चे ऑनलाइन व्हिडिओ फीड सुरू केले, ज्याचे नाव ‘ट्रम्प टीव्ही“ ठेवण्यात आले आहे.

Advertisement

ट्रम्प टीव्हीवर ट्रम्प यांचे जुने व्हिडिओ, सरकारच्या घोषणा आणि नव्या घडामोडी दाखविण्यात येणार आहेत. व्हाइट हाउसचे लाइव्ह कार्यक्रम देखील लोक फोन आणि इतर इंटरनेटयुक्त उपकरणांवर पाहू शकतील. व्हाइट हाउसमध्ये सोमवारी नव्या हॅलिपॅडचे उद्घाटन झाले, सर्वसाधारणपणे अशा कार्यक्रमांचे थेट प्रसारण टीव्ही नेटवर्क्स करतात, परंतु यावेळी त्यांनी संयुक्तपणे प्रसारण रोखले. याचमुळे व्हाइट हाउसने स्वत: कार्यक्रमाचा व्हिडिओ जारी केला. कार्यक्रमात टीव्ही नेटवर्क्सचे कॅमेरे आणि मायक्रोफोन नव्हते. यामुळे ट्रम्प यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नव्हता. मरीन वनच्या आवाजामुळेही उपस्थितांना त्रास झाला.

न्यूयॉर्क टाइम्सने रोखले फोटो कव्हरेज

अमेरिकेतील वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने व्हाइट हाउसच्या फोटो पूलकडून मिळालेली छायाचित्रे प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला. व्हाइट हाउसकडून बंदी घालण्यात आलेल्या पत्रकारांशी संबंधित प्रसारमाध्यमांना समर्थनार्थ हा निर्णय घेतल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. परंतु न्यूयॉर्क टाइम्सने ट्रम्प यांच्या न्यूयॉर्क दौऱ्याचे वृत्तांकन जारी ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रेसिडेंशियल पूल

अमेरिकेत अध्यक्षांच्या प्रत्येक कार्यक्रमात सर्व वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पोहोचू शकत नाहीत. याचमुळे एबीसी, सीबीएस, सीएनएन, फॉक्स न्यूज आणि एनबीसीने संयुक्त व्यवस्था निर्माण केली असून तिला ‘प्रेसिडेंशियल टेलिव्हिजन पूल“ म्हटले जाते. यात नेटवर्क्स आळीपाळीने अध्यक्षांच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ रिकॉर्ड करतात आणि फुटेज इतर माध्यम संस्थांनाही उपलब्ध करतात. यावेळी सीएनएनकडे जबाबदारी होती, परंतु व्हाइट हाउसने त्याच्या पत्रकारांवर बंदी घातली होती. यानंतर उर्वरित नेटवर्क्सने सीएनएनच्या जागी वृत्तांकन करण्याऐवजी संयुक्त टीव्ही पूललाच रोखले आहे.

बंदीविरोधात न्यायालयात धाव

सीएनएन, एमएस नाऊ आणि पॉलिटिकोने ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात अमेरिकेच्या संघीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिन्ही माध्यम संस्थांनी व्हाइट हाउसनमध्ये स्वत:चा अॅक्सेस पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. पहिल्या आणि पाचव्या घटनादुरुस्तीच्या अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचे उल्लंघन ट्रम्प प्रशासनाने केल्याचा दावा तिन्ही माध्यम संस्थांनी केला आहे तसेच याप्रकरणी जलद सुनावणीची देखील मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांवर पक्षपाताचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प हे 2016 पासूनच सीएनएनच्या वृत्तांना ‘फेक न्यूज“ ठरवत आले आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात देखील सीएनएनच्या पत्रकारांच्या व्हाइट हाउस पासवरून वाद झाला होता. ट्रम्प यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स“ आणि ‘वॉल स्ट्रीट जर्नल“ यासारख्या मोठ्या वृत्तपत्रांवरही स्वत:च्या विरोधात पक्षपातपूर्ण वृत्त प्रकाशित केल्याचा आरोप केला. या माध्यम संस्थांच्या वृत्तांकनावर अनेकदा प्रश्न उपस्थित करत ट्रम्प यांनी काही प्रकरणांमध्ये मानहानीचे खटलेही दाखल केले.

Advertisement
Tags :

.