For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुढील वर्षीच्या प्रारंभी ट्रम्प भारत भेटीवर

01:58 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुढील वर्षीच्या प्रारंभी ट्रम्प भारत भेटीवर
Advertisement

परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांची घोषणा : लवकरच दौऱ्याची रुपरेषा आखणार

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षीच्या सुरुवातीला (2027) भारताला राजनयिक दौऱ्यावर भेट देतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी शनिवारी अधिकृतपणे जाहीर केली. या घोषणेमुळे दोन्ही देशांमधील वाढत्या जवळीकीवर प्रकाश पडला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट केवळ एक औपचारिक भेट नसून, भारत-अमेरिका संबंधांमधील ‘सुवर्णयुगाची’ सुरुवात होईल, असे मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले. भेटीची रुपरेषा अंतिम करण्यासाठी रुबियो स्वत: लवकरच भारतात दाखल होतील. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आगमनापूर्वी सर्व महत्त्वाचे द्विपक्षीय मुद्दे आणि प्रोटोकॉल निश्चित करणे हा त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश आहे.

Advertisement

ट्रम्प यांच्या भारत भेटीचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार पूर्णत्वास नेणे हा असेल. भारताच्या दौऱ्यात व्यापार करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे संकेत रुबियो यांनी दिले आहेत. जर हा करार यशस्वी झाला, तर तो दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी एक मैलाचा दगड ठरेल आणि व्यापारासाठी नवीन मार्ग खुले करेल. भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक भागीदारी आता अधिक व्यावसायिक सामर्थ्याकडे वाटचाल करत आहे.

जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय

अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची उघडपणे प्रशंसा करताना स्वत:ला त्यांचे मोठे प्रशंसक असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत एक ‘जागतिक शक्ती’ म्हणून उदयास आला असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतासोबतची भागीदारी भविष्यात अमर्याद संधी निर्माण करेल, असा विश्वास अमेरिकन प्रशासनाला आहे. अमेरिका आता भारताला केवळ दक्षिण आशियामध्येच नव्हे, तर संपूर्ण जगात एक निर्णायक शक्ती म्हणून पाहते.

Advertisement
Tags :

.