For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प आजपासून ‘करपत्रे’ पाठविणार

06:58 AM Jul 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प आजपासून ‘करपत्रे’ पाठविणार
Advertisement

प्रतिदिन 10 देशांना सूचनापत्रे पाठविण्याची योजना

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे आणलेल्या प्रतिद्वंद्वी करयोजनेवर कृती करण्यास अमेरिकेने प्रारंभ केला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून (भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवार) ट्रम्प विविध देशांना, त्यांच्या मालावर अमेरिकेने किती कर लावला आहे, याची सूचना देणारी पत्रे पाठविण्यास प्रारंभ करत आहेत. प्रतिदिन 10 देश याप्रमाणे ही पत्रे पाठविली जातील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

Advertisement

सध्या भारताची अमेरिकेशी व्यापार करार करण्याविषयी चर्चा होत आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची वक्तव्ये दोन्ही देशांच्या उच्चपदस्थ नेत्यांनी केली आहेत. स्वत: अध्यक्ष ट्रम्प यांनीही भारताची व्यापक करार होण्याची शक्यता आहे, असे विधान केलेले आहे. हा करार 9 जुलैच्या आत करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक आहेत, असे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या ‘करपत्रां’कडे पाहिले जात आहे. भारताचा अमेरिकेशी करार झाला, तर त्या करारानुसार जे कर निर्धारित केले जातील, ते दोन्ही देशांकडून लागू केले जातील. मात्र, करार झाला नाही, तर ट्रम्प यांनी आधी भारताच्या मालावर जो कर लावण्याची घोषणा केली आहे, त्या घोषणेनुसार भारताच्या अमेरिकेला निर्यात होणाऱ्या मालावर कर अमेरिकेकडून लावला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

9 जुलैपासून योजना लागू

अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे शपथग्रहण केल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील जवळपास सर्व देशांवर प्रतिद्वंद्वी कर लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी सर्व देशांवर प्रत्येकी किती प्रमाणात कर लागणार, याचे कोष्टक प्रसिद्ध पेले होते. तथापि, नंतर या योजनेला त्यांनी 3 महिन्यांची स्थगिती दिली होती. 9 जुलैला हा स्थगिती कालावधी संपत आहे. त्यामुळे 10 जुलैपासून ट्रम्प यांची योजना लागू होईल, असे सर्वसाधारणत: मानले जात आहे. ज्या देशांशी व्यापार करारावर चर्चा होत आहे, त्यांना कदाचित उशिरा करपत्रे पाठविली जातील.

चर्चा प्रगतीपथावर, पण...

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारासंबंधी चर्चा प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन दोन्ही देशांकडून केले जात आहे. तथापि, कृषी उत्पादने आणि त्यांची भारतातील बाजारपेठ यांच्यासंदर्भात वाद निर्माण झाला आहे. भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेतल्या काही कृषी उत्पादनासाठी मोकळी करावी, असा अमेरिकेचा आग्रह आहे. तथापि, भारताची कृषी बाजारपेठ संरक्षित असल्याने भारत हा प्रस्ताव मान्य करेल काय, हा महत्वाचा प्रश्न आहे.

कोणत्या देशावर किती कर...

ट्रम्प यांनी त्यांच्या आधीच्या योजनेनुसार थायलंड या देशावर 36 टक्के कर लावला आहे. तर इंडोनेशियावर 32 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली आहे. जपानशी व्यापार करार फिस्कटल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले असून जपानच्या मालावर 24 टक्के कर लावला आहे. दक्षिण कोरियावर 25 टक्के, मलेशियावर 24 टक्के तर युरोपियन महासंघावर 20 टक्के कर लावण्यात आला आहे. तसेच अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्रदेश तैवानवरही 32 टक्के कर लावलेला आहे.

Advertisement
Tags :

.