हेगसेथ यांना पदाबाबत ट्रम्प निर्णय घेणार
इराण युद्ध लांबल्याने नाराजीचा दावा
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांना पदावरून हटवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. ‘द अटलांटिक“ या अमेरिकन नियतकालिकाच्या अहवालानुसार, हेगसेथ यांनी ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. युद्ध काही महिन्यांत संपेल, असा विश्वासही त्यांनी ट्रम्प यांना दिला होता. मात्र, आठ महिन्यांनंतरही युद्ध सुरूच असल्याने ट्रम्प आता यासाठी जबाबदार कोण, याचा शोध घेत आहेत.
ट्रम्प आपल्या निकटवर्तीय सहकाऱ्यांकडून संरक्षणमंत्री हेगसेथ आणि अमेरिकेच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांच्या कामकाजाबाबत मते जाणून घेत आहेत. इराण युद्धाच्या संदर्भात हे दोघेही ट्रम्प यांचे प्रमुख सल्लागार राहिले आहेत.
व्हाइट हाऊसमधील अनेक अधिकारी हेगसेथ यांच्यावर नाराज असल्याचे समजते. ट्रम्प यांना खूश ठेवण्यासाठी हेगसेथ युद्धातील वास्तविक परिस्थिती सांगत नसल्याचे काही निकटवर्तीयांचे मत आहे. मात्र, पेंटागॉनचे प्रवक्ते सीन पार्नेल यांनी हे आरोप फेटाळले आहेत. हेगसेथ राष्ट्राध्यक्ष आणि व्हाइट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लष्करी कारवाईची संपूर्ण माहिती देतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
मध्यावधी निवडणुकीतील पराभवाची चिंता
इराण युद्धाचा परिणाम मध्यावधी निवडणुकीत रिपब्लकिन पक्षाच्या कामगिरीवर होत असल्याची चिंता ट्रम्प यांना आहे. अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांतील बहुमत गमावण्याची शक्मयता असल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जाते. युद्ध लवकर संपेल, असा विश्वास देणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असल्याचे अहवालात म्हटले आहे. 29 ऑक्टोबर रोजी हेगसेथ आणि जनरल डॅन केन यांनी ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासमोर युद्धासंबंधी विविध पर्याय मांडले होते. या पर्यायांच्या माध्यमातून ट्रम्प यांना विजयाचा दावा करता येईल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
गोपनीय माहितीच्या गळतीवरून अधिकाऱ्यांवर कारवाई
ट्रम्प यांचा विश्वास संपादन करण्यासाठी हेगसेथ यांनी गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवल्याच्या संशयावरून अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी जॉइंट स्टाफचे नियोजन संचालक लेफ्टनंट जनरल ब्र्रेट सिल्व्हिया यांना पदावरून हटवले. इराण युद्ध आणि शस्त्रसाठ्यातील कमतरतेशी संबंधित माहिती प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पेंटागॉनमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. जनरल डॅन केन यांच्या अधिपत्याखालील जॉइंट स्टाफमध्ये गोपनीय माहितीची गळती होत असल्याचा हेगसेथ यांना संशय आहे. राष्ट्राध्यक्षांना प्रत्येक परिस्थितीत साथ देणारा अधिकारी अशी आपली प्रतिमा त्यांनी निकटवर्तीयांमध्ये निर्माण केली आहे. ट्रम्प यांना ही भूमिका पसंत असल्याचे सांगितले जाते. आपल्या पहिल्या कार्यकाळापासूनच त्यांना पेंटागॉनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्ठेबाबत संशय राहिला आहे. त्यामुळे हेगसेथ यांच्यावरील विश्वास आणि युद्धातील त्यांच्या भूमिकेचा आढावा घेतला जात असल्याची चर्चा आहे.