ट्रंप यांची अॅपलला करवाढीची धमकी
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
अॅपल कंपनीने अमेरिकेबाहेर बनविलेले आयफोन अमेरिकेत विकण्याचा प्रयत्न केल्यास या फोन्सवर 25 टक्के व्यापार शुल्क लावले जाईल, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रंप यांनी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना भारतात आपला व्यवसाय वाढवू नका, असा सल्ला दिलेला होता. मात्र, तो मानला गेला नव्हता. अॅपल कंपनी प्रत्येक वर्षी अमेरिकेत 6 कोटी आयफोन्सची विक्री करते. या फोन्सपैकी 80 टक्के फोन्स चीनमध्ये बनविण्यात आलेले असतात. भारतात 10 टक्के फोन्स जुळविण्यात येतात. अशा फोन्सवर यापुढे 25 टक्के कर आकारण्यात येईल, असा इशारा ट्रंप यांनी दिला आहे. अॅपल कंपनीने भारतात आपला व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप यांनी या कंपनीच्या अमेरिकेबाहेर उत्पादित केलेल्या आयफोन्सवर असा कर बसविल्यास अमेरिकेत आयफोन्स महाग होण्याची शक्यता आहे. अॅपल कंपनीने आपला मोबाईल उत्पादनाचा व्यवसाय अन्य कोणत्याही देशांमध्ये करण्यापेक्षा अमेरिकेतच करावा, अशी ट्रंप यांनी मागणी आहे. अॅपलच्या पुढच्या भूमिकेकडे आता भारत आणि चीनचे लक्ष आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार
भारत आणि अमेरिका यांच्यात दोन्ही देशांच्या लाभाचा ठरेल, असा व्यापक व्यापारी करार होण्याची शक्यता आहे. मात्र, तो नेमका केव्हा होणार याविषयी अद्याप संदिग्धता आहे. या करारासंबंधी चर्चा वेगाने पुढे जात आहे, असे दोन्ही देशांचे म्हणणे आहे. हा करार झाल्यास दोन्ही देशांच्या कररचनेत स्थैर्य येऊ शकते. मात्र, हा करार होण्याआधीच ट्रंप यांनी भारतात किंवा अन्य कोणत्याही देशांमध्ये बनणाऱ्या आयफोन्सवर 25 टक्के कर लावण्याचा इशारा दिला आहे.