ट्रम्प करप्रणाली आजपासून कार्यान्वित
भारतावर 26 टक्के तर चीनवर 104 टक्के कर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित प्रतिद्वंद्वी करपद्धतीचे कार्यान्वयन आज बुधवारपासून सुरू झाले आहे. या करप्रणालीमुळे जगाची आर्थिक समीकरणे परिवर्तीत होणार असून त्यामुळे अनेक देश धास्तावले आहेत. ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के तर चीनवर तब्बल 104 टक्के कर लावला आहे. याखेरीज ते एक-दोन दिवसांमध्ये औषधांवरही कर लागू करण्याची घोषणा करणार आहेत.
आजवर अमेरिकेच्या उदार करप्रणालीचा लाभ जगातील जवळपास सर्व देशांनी उठविला आहे. जगाने अमेरिकेचे आर्थिक शोषण केले आहे. आता अमेरिका धोरणाने जगाची वागणार असून आमच्या आजवर झालेल्या हानीची भरपाई जगाकडून करुन आपले सामर्थ्य दाखविणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
2 एप्रिलला घोषणा
2 एप्रिलला ट्रम्प यांनी या करप्रणालीची घोषणा केली होती. ही करयोजना 9 एप्रिलपासून प्रत्यक्षात आणण्यात येणार होती. त्यानुसार ती लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार त्यांनी जवळपास सर्व देशांवर कमी अधिक प्रमाणात कर लावले आहेत. तर काही देशांना करांमधून मुक्त ठेवण्यात आलेले आहे.
काय आहे धोरण
जो देश अमेरिकेतून त्या देशात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर जितका कर लावेल, त्याच्यावर तितक्याच प्रमाणात कर अमेरिकेकडून लागू करण्यात येणार आहे. ही ट्रम्प यांची प्रणाली आहे. त्यामुळे अनेक देश धास्तावले आहेत. जगातील अनेक देशांचे शेअरबाजार ट्रम्प यांच्या धोरणामुळे उध्वस्त झालेले मंगळवारी पाहावयास मिळाले, बुधवारी त्यांच्यापैकी काही शेअरबाजार सावरल्याचेही दिसून येत होते.
चीनकडून प्रत्युत्तर
ट्रम्प यांच्या धोरणाला चीनने कडाडून विरोध केला असून अमेरिकेशी शेवटच्या क्षणापर्यंत दोन हात केले जातील, अशी घोषणा चीनने केली आहे. चीनवर ट्रम्प यांनी प्रथम 24 टक्के, नंतर 30 टक्के आणि आता आणखी 50 टक्के असा एकंदरीत 104 टक्के कर लावल्याची घोषणा केली होती. आता चीननेही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची तयारी चालविली आहे. चीनने अमेरिकतून आयात केल्या गेलेल्या मालावर 84 टक्के कर लावत असल्याची घोषणा केली आहे.
व्यापारयुद्धास प्रारंभ
जगातील प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारी अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा चीन यांनी एकमेकांवर करा लागू करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे जागतिक व्यापारयुद्धाला प्रारंभ झाला आहे, असे तज्ञांचे मत आहे. दोन मोठ्या देशांमध्ये होत असलेल्या या व्यापारयुद्धात त्यांच्यावर अवलंबून असलेले इतर अनेक छोटे देश भरडून निघण्याची शक्यता आहे.
भारतावर कोणता परिणाम...
भारतावर अमेरिकेच्या या धोरणाचा कोणता परिणाम होईल, यावर बरीच मते व्यक्त होत आहेत. भारताला या धोरणाचा फटका बसेल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र, काही अर्थतज्ञांच्या मते भारतासाठी ही सुसंधी असून तिचा योग्य लाभ उठविण्याचे धोरण स्वीकारल्यास भारताचा लाभ हेणे शक्य आहे. ट्रम्प यांनी औषधांच्या आयातीवर कर लावल्यास भारताला फटका बसणार आहे. कारण भारताकडून अमेरिकेला 800 कोटी डॉलर्सची औषधे पुरविली जातात. या निर्यातीवर विपरीत परिणामाची संभावना आहे. तथापि, एकंदरीत पाहता, भारताचा अमेरिकेशी व्यापार इतर देशांच्या तुलनेत बराच कमी असल्याने भारताला ट्रम्प यांच्या धोरणामुळे विशेष चिंता करण्याचे कारण नाही, असेही अनेकांचे मत आहे. तथापि, भारताने विशेष बभ्रा न करता तयारी चालविली आहे.
आता अमेरिकेची किंमत कळली...
अमेरिकेने जगातील सर्व देशांवर कर लावले आहेत. याचा परिणाम आता दिसून येत असून अमेरिकेशी व्यापार करार करण्यास अनेक देश प्रयत्नशील आहेत. आता त्यांना अमेरिकेची किंमत कळली असून आमच्याशी बोलणी करा, अशी विनंती ते अमेरिकेला करीत आहेत. यातून अमेरिकेचे महत्व किती आहे, याची प्रचीती येते, असे गौरवोद्गार डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. आता अनेक देश करारासाठी आमची मनधरणी करत आहेत. तथापि, अमेरिका आपल्या निर्णयाशी ठाम आहे. लवकरच जगाला अमेरिकेसमोर नमते घ्यावे लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. ते व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी वार्तालाप करीत होते.