ट्रम्प समर्थक-मस्क आमने-सामने
भारतीय स्थलांतरितांचा मुद्दा : विदेशी तंत्रज्ञांकरता मस्क आग्रही : ट्रम्प समर्थकांचा विरोध
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही समर्थकांदरम्यान भारतीय स्थलांतरितांवरून वाक्युद्ध सुरू आहे. मस्क आणि भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी हे गुणवत्ता आधारित इमिग्रेशन सुधारणा म्हणजेच एच-1बी व्हिसाचे समर्थन करत आहेत. तर ट्रम्प यांचे काही समर्थक म्हणजेच लॉरा लूमर, मॅट गेट्ज आणि एन कूल्टर याच्या विरोधात आहेत. त्यांच्यानुसार यामुळे अमेरिकन लोकांच्या हिस्स्याच्या नोकऱ्या विदेशी लोकांना मिळतील.
23 डिसेंबर रोजी भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन यांना डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात एआय पॉलिसी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आल्यावर हा वाद सुरू झाला आहे. कृष्णन हे चेन्नईत जन्मलेले भारतीय-अमेरिकन इंजिनियर आहेत. कृष्णन यांच्या नियुक्तीमुळे ट्रम्प समर्थक सोशल मीडिया इनफ्लुएंसर लॉरा लूमर नाराज झाल्या आहेत. अनेक डाव्या विचारसरणीचे लोक आता ट्रम्प प्रशासनात नियुक्त केले जात असल्याचे दु:ख आहे. हे लोक अमेरिका फर्स्ट अजेंड्याच्या थेट विरोधात आहेत. आमच्या देशाची निर्मिती श्वेतवर्णीय युरोपियन्सनी केली होती, भारतीयांनी नव्हे असे लॉरा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद पेले आहे. तसेच त्यांनी श्रीराम कृष्णन यांच्या एका जुन्या पोस्टवर प्रश्न उपस्थित केला. यात कृष्णन यांनी कुशल तंत्रज्ञांसाठी व्हिसा आणि ग्रीनकार्ड विस्ताराचे समर्थन केले होते.
लॉरा यांच्या या पोस्टनंतर चर्चेत मस्क यांनी उडी घेतली. मस्क स्वत: दक्षिण आफ्रिकेतून आलेले स्थलांतरित आहेत. अमेरिकेच्या कंपन्यांच्या गरजेनुरुप कुशल लोक अमेरिकेत नाहीत. जर तुम्ही तुमच्या टीमला चॅम्पियनशिप जिंकवून देऊ इच्छित असाल तर तुम्हाला चांगल्या लोकांची भरती करावी लागेल, मग ते कुठलेही असोत असे मस्क यांनी म्हटले आहे. अमेरिका विजयी व्हावा का पराभूत व्हावा? जर तुम्ही जगातील सर्वात चांगल्या प्रतिभांना दुसरीकडे जाण्यास भाग पाडाल तर अमेरिका पराभूत होईल असा दावा मस्क यांनी केला.
लूमर यांचे प्रत्युत्तर
मस्क यांच्या दाव्याल लूमर यांनी प्रत्युत्तर दिले. ट्रम्प यांच्या अमेरिकेला पुन्हा महान करण्याच्या लक्ष्यासोबत मस्क नाहीत. ते ट्रम्प यांच्यासाठी एक अडथळा आहेत. ते ट्रम्प यांच्यासोबत केवळ स्वत:च्या लाभासाठी जोडले गेले आहेत असा आरोप लूमर यांनी केला. ट्रम्प यांना प्रचारासाठी 250 दशलक्ष डॉलर्स (2 हजार कोटी रुपये) देणारे मस्क हे स्वत:ला इतरांनी हिरो समजावे अशी इच्छा बाळगून आहेत परंतु त्यांनी दिलेल्या देणगीपेक्षा कितीतरी अधिक रक्कम ते कमाविणार आहेत असेही लूमर यांनी म्हटले आहे.
कुशल विदेशींशिवाय पतन निश्चित
मस्क यांच्या समर्थनार्थ रामास्वामी या वादात उतरले. त्यांनी मस्क यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टमुळे हा वाद आणखीच तीव्र झाला. कुशल विदेशी लोकांशिवाय अमेरिकेचे पतन निश्चित असल्याचे त्यांनी नमूद केले. आघाडीच्या कंपन्या मूळ अमेरिकन लोकांऐवजी विदेशी लोकांना नोकरीवर ठेवतात. याचे कारण अमेरिकन लोकांमध्ये जन्मजात आयक्यूची कमतरता आहे हे नाही. याचे कारण अमेरिकन संस्कृतीचे सरासरी दर्जाच्या दिशेने वाटचाल करणे आहे. अमेरिकेत शिक्षणापेक्षा अधिक महत्त्व फॅशनला दिले जात असल्याचे रामास्वामी यांनी म्हटले आहे.
भारताचा उल्लेख
रामास्वामी यांच्या या पोस्टनंतर अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे समर्थक भडकले आहेत. भारत जरा खरोखरच इतका कुशल असेल तर भारतीयांनी तेथेच का राहू नये? स्वस्त कामगार म्हणून त्यांची भरती केली जाते असे मानले तरीही हेच लोक आम्हाला वर्णद्वेषी ठरवतात असा आरोप लॉरा यांनी केला. रामास्वामी यांना विरोध करणाऱ्यांमध्ये निक्की हेली यांचाही समावेश राहिला. अमेरिकेच्या संस्कृतीत काहीच चुकीचे नाही. आम्ही अमेरिकन्समध्ये गुंतवणूक करत त्यांना प्राथमिकता देण्याची गरज आहे असे हेली म्हणाल्या.