ट्रम्प अद्याप असुरक्षित : पुतीन
अमेरिकेत यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांची हत्या
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली आहे. अध्यक्षीय निवडणूक जिंकून ट्रम्प यांनी एक मोठी परीक्षा पास केली असली तरीही ते अद्याप सुरक्षित नाहीत असे पुतीन यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांना रोखण्यासाठी अनेक गैरमार्गांचा वापर झाला आहे. दोनवेळा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला देखील झाला. ट्रम्प यांना अद्याप सतर्क रहावे लागणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात अशाप्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अनेक मोठ्या नेत्यांची हत्या झाली आहे. ट्रम्प यांना या धोक्याची जाणीव असेल अशी अपेक्षा असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
ट्रम्प हे जुलै महिन्यात पेंसिल्वेनियामध्ये भाषण करत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. यानंतर सप्टेंबरमध्ये फ्लोरिडा गोल्फ कोर्समध्ये एका इसमाने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुदैवाने ते वाचले होते.
ट्रम्प यांचा परिवार आणि त्यांच्या मुलांविषयी अनेक वक्तव्यं करण्यात आली आहेत. रशियात असे घडत नाही. येथे वाईट लोक देखील परिवाराला संघर्षात ओढत नाहीत असे पुतीन यांनी म्हटले आहे.
बिडेन वाढवत आहेत अडचणी
बिडेन प्रशासन जाणूनबुजून ट्रम्प यांच्यासाठी अडचणी वाढवत आहे. परंतु ट्रम्प एक हुशार राजकारणी असून ते युद्ध संपुष्टात आणण्यासाठी कुठला न कुठला मार्ग शोधून काढतील. आम्ही देखील ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत. ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर अमेरिका-रशिया संबंध सुधारतील अशी अपेक्षा आहे असे पुतीन म्हणाले.
युक्रेनला धमकी
पुतीन यांनी युक्रेनवर आणखी आरेश्निक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. रशियाने यापूर्वी 21 नोव्हेंबर रोजी युक्रेनचे शहर निप्रोवर ओरेश्निक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. रशियाने गुरुवारी युक्रेनवर सुमारे 200 क्षेपणास्त्रs आणि ड्रोनने हल्ला केला होता.