ट्रम्प यांना सीईओ कूक यांच्याकडून सोन्याची भेटवस्तू
अॅपलची अमेरिकेत गुंतवणूक करण्याची ग्वाही
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी 6 ऑगस्ट रोजी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 24 कॅरेट सोन्यावर आधारित एक खास भेट दिली. अॅपलच्या ‘अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम’च्या विस्ताराचा आनंद साजरा करण्यासाठी कुक यांनी ही भेट दिली. अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी अतिरिक्त 9 लाख कोटी रुपये गुंतवण्याचे आश्वासन देखील या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना दिले आहे.
ट्रम्प नावासह मेड इन यूएसचा उल्लेख
ट्रम्प यांना दिलेली कस्टम मेड भेट ही काचेची डिस्क आहे. ही 24 कॅरेट सोन्याची बेस आहे. त्यात वापरलेली काच अॅपलच्या पुरवठादार कॉर्निंगने बनवली आहे. मध्यभागी अॅपलचा लोगो आहे. ट्रम्प यांचे नाव वरच्या बाजूला कोरलेले आहे, तर कुकची स्वाक्षरी खाली ‘मेड इन यूएस’ आणि वर्ष 2025 सोबत दिसते. कुकच्या मते, ही रचना सध्या अॅपलमध्ये काम करणाऱ्या माजी यूएस मरीन कॉर्प्स कॉर्पोरलने तयार केली आहे.
50 लाख कोटींपेक्षा अधिकची गुंतवणूक करणार
अॅपल 4 वर्षांत 50 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे. अॅपलने अमेरिकेत उत्पादन वाढविण्यासाठी 100 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 9 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक जाहीर केली आहे. अमेरिकेत शक्य तितके उत्पादन हवे असलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी, अॅपलने 4 वर्षांत 500 अब्ज डॉलर्स (सुमारे 44 लाख कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली होती. ही गुंतवणूक योजना कंपनीच्या देशांतर्गत पुरवठा साखळी आणि प्रगत उत्पादन क्षमता मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करेल. म्हणजेच, अॅपल आता 50 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अॅपलची उत्पादने भारतात बनवायची नाहीत असे वाटते. काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी कंपनीचे सीईओ टिम कुक यांना सांगितले होते की भारतात कारखाने सुरू करण्याची गरज नाही.
अमेरिकेत 50 टक्के आयफोन भारतातील
अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की अमेरिकन बाजारपेठेत विकले जाणारे 50 टक्के आयफोन भारतात बनवले जातात. कुक म्हणाले की एप्रिल-जून तिमाहीत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनसाठी भारत हा मूळ देश बनेल. त्यांनी सांगितले की एअरपॉड्स, अॅपल वॉच सारखी इतर उत्पादने देखील बहुतेक व्हिएतनाममध्ये बनवली जात आहेत.