युक्रेनला मदत करण्यास ट्रम्प तयार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला युद्धात मदत करण्याच्या बदल्यात रेयर अर्थ मटेरियल (दुर्लभ खनिज)वरून करार करणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने युक्रेनला स्वत:च्या युरोपीय सहकाऱ्यांच्या तुलनेत अधिक सैन्य आणि आर्थिक सहाय्य केले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
युक्रेनमधील रेयर अर्थ मटेरियल आणि अन्य महत्त्वपूर्ण साधनसामग्रीची सुरक्षा करता येईल अशाप्रकारचा करार आम्ही करू इच्छितो. अमेरिकेला आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अर्थव्यवस्था करण्यासाठी रेयर अर्थ मटेरियलवरून एक करार करण्यास तयार असल्याचे संदेश युक्रेनच्या सरकारकडून मिळाला आहे. रेयर अर्थ मटेरियलची आम्ही सुरक्षा इच्छितो. आम्ही शेकडो अब्ज डॉलर्स युक्रेनवर खर्च करत आहोत. युक्रेनकडे रेयर अर्थ मटेरियलचा मोठा साठा असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
रेयर अर्थ मटेरियल 17 एलिमेंट्सचा ग्रूप असून त्याचा कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सपासून सैन्य उपकरणांपर्यंत वापर होतो. याचा वापर आयटी क्षेत्र, सौर ऊर्जा, रसायन उद्योगासोबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या ऑइल रिफायनरीमध्ये आणि अनेक अन्य उद्योगक्षेत्रांमध्ये होत असतो.
युक्रेनला सामील केल्याशिवाय अमेरिका आणि रशियातील कुठलीही चर्चा आम्हाला मान्य नसेल. ट्रम्प अणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे वैयक्तिक पातळीवर संबंध असू शकतात. परंतु युक्रेनचे भवितव्य युक्रेनच ठरविणार आहे. आमची टीम सातत्याने ट्रम्प प्रशासनाच्या संपर्कात आहे. लवकरच आमची आमने-सामने बैठक होणार असल्याचे उद्गार अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी काढले आहेत.