ट्रम्प यांनी वाढविली कॅनडा-चीनची चिंता
भरभक्कम आयात शुल्काची घोषणा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिकोतून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर 25 टक्के आयातशुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ट्रम्प यांनी ही घोषणा अमेरिकेत अवैध स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळे नाराज होत केली आहे. तसेच ट्रम्प यांनी अमेरिकेत अवैध मार्गाने येत असलेल्या ड्रग्जसाठी चीनला जबाबदार ठरविले आहे. तसेच चीनवर अतिरिक्त 10 टक्के आयातशुल्क लादणार असल्याचे म्हटले आहे.
20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर सर्वप्रथम कॅनडा, चीन आणि मेक्सिकोतून येणाऱ्या सामग्रीवर आयातशुल्क वाढविण्याचा निर्णय घेणार आहे. हजारो लोक मेक्सिको आणि कॅनडामधून अमेरिकेत दाखल होत आहेत. हे लोक स्वत:सोबत अमली पदार्थ आणि गुन्हेगारी घेऊन येत आहेत. कॅनडा आणि मेक्सिको हे देश अवैध स्थलांतर रोखू शकतात आणि त्यांच्याकडे असे करण्याची शक्ती देखील आहे. याचमुळे कॅनडा आणि मेक्सिकोतून येणाऱ्या उत्पादनांवर 25 टक्के आयातशुल्क आकारले जाणार आहे. अमेरिकेत कॅनडा आणि मेक्सिकोच्या सीमेतून येणाऱ्या अवैध स्थलांतरितांना रोखले जात नाही तोवर या देशांना भरभक्कम शुल्क द्यावे लागणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
चीनमधून फेंटानिलचा पुरवठा
चीनमधून अमेरिकेत ड्रग्ज खासकरून फेंटानिल मोठ्या प्रमाणावर येत आहे. यापूर्वीही चीनसमोर ड्रग्जचा मुद्दा मी उपस्थित केला आहे. चीनने देखील ड्रग्ज पॅडलर्स विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होत.s. तरीही अमेरिकेत फेंटानिल ड्रग्जचा पुरवठा सुरूच आहे. अशास्थितीत आमचे प्रशासन ड्रग्ज पुरवठा न रोखल्याप्रकरणी चीनवर अतिरिक्त 10 टक्के शुल्क लादणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
कॅनडासमोर संकट
कॅनडा हा सर्वाधिक व्यापारावर निर्भर असलेल्या देशांपैकी एक आहे. कॅनडाची 75 टक्के निर्यात अमेरिकेला होते. ही व्यापार निर्भरता कॅनडाला अमेरिकन आर्थिक अणि विदेश धोरणांमधील बदलांबद्दल संवेदनशील ठरविते. तर कॅनडामधून मोठ्या प्रमाणावर अवैध स्थलांतरित अमेरिकेत दाखल होत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी ट्रम्प हे कॅनडाच्या सरकारवर दबाव आणू पाहत आहेत.