ट्रंप यांनी ‘पोस्ट’ केला नवा नकाशा
व्हेनेझुएला, कॅनडा आणि ग्रीनलंडचा समावेश
► वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेचा नवा नकाशा त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या वेबसाईटवर प्रकाशित केला आहे. त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे. कारण, या अमेरिकेच्या या नकाशात त्यांनी व्हेनेझुएला, कॅनडा आणि ग्रीनलंडचाही समावेश केला आहे. सध्या ग्रीनलंडवरुन अमेरिका आणि युरोपियन महासंघ यांच्यात प्रचंड शाब्दिक युद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर एक दबावतंत्र म्हणून ट्रंप यांनी हा नकाशा आपल्या वेबसाईटवर प्रसारित केला असण्याची शक्यता आहे.
इतकेच करुन ट्रंप थांबलेले नाहीत. अमेरिकेचा नवा नकाशा प्रसारित केल्यानंतर त्वरीत त्यांनी आपल्या याच वेबसाईटवर आणखी एक पोस्टर प्रसिद्ध केले असून त्यात ते स्वत: अमेरिकेचा ध्वज ग्रीनलंडच्या भूमीवर रोवत असल्याचे दिसून येत आहे. या पोस्टरमध्ये त्यांच्यासह अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ हेही असल्याचे पहावयास मिळत आहे.
सत्तेत एक वर्ष पूर्ण
20 जानेवारीला डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. 20 जानेवारी 2025 या दिवशी त्यांचा शपथविधी झाला होता. या एक वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या व्यापार शुल्क आणि इतर धोरणांमुळे संपूर्ण जगाचीच व्यवस्थाच पालटून टाकली आहे. उत्तर ध्रूवानजीक असलेला आणि अत्यंत तुरळक लोकवस्तीचा ग्रीनलंड हा देश अमेरिकेच्या आधीन व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. हा देश अमेरिकेमध्ये समाविष्ट झाल्याशिवाय अमेरिका सुरक्षित राहू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, अमेरिकेने ग्रीनलंड आपल्या आधीन करण्यास युरोपातील अनेक प्रबळ देशांचा विरोध आहे.
मॅक्रॉन यांची टीका
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्रंप यांच्यावर टीका केली आहे. ग्रीनलंड ताब्यात आल्याशिवाय अमेरिकेच्या सुरक्षिततेची हमी देता येणार नाही, ही ट्रंप यांची संकल्पना चुकीची आहे. घराला केव्हातरी आग लागेल, म्हणून स्वत:चे ते जाळून टाकण्याचा प्रकार ट्रंप करीत आहेत, असे वक्तव्य मॅक्रॉन यांनी केल्याने ट्रंप संतप्त झाले आहेत. त्यांनीही फ्रान्सवर पलटवार करण्यास प्रारंभ केला आहे.
गाझा प्रक्रियेला नकार
ग्रीनलंडप्रमाणे ट्रंप आणखी एका प्रश्नात पुढाकार घेत आहेत. इस्रालयला लागून असणाऱ्या गाझा पट्टीत शांतता स्थापन व्हावी आणि गाझाचे पुनर्निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी अनेक देशांचे एक ‘गाझा शांती मंडळ’ स्थापन केले आहे. या मंडळात त्यांनी भारतालाही आमंत्रित केले आहे. फ्रान्सलाही असे आमंत्रण असून फ्रान्सने मात्र या आमंत्रणाचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ट्रंप यांनी फ्रान्सवर 200 टक्के व्यापार शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे.
ट्रंप यांना ग्रीनलंड का हवे...
ग्रीनलंड हा देश अमेरिकेच्या आधीन करुन घेण्याचा निर्धार डोनाल्ड ट्रंप यांनी केल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या चारही मार्गांनी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. सध्या ग्रीनलंड हा देश डेन्मार्क या देशाच्या आधीन आहे. ट्रंप यांच्या ग्रीनलंड घेण्याच्या योजनेला युरोपचा विरोध असल्याचे दिसून येत आहे. युरोपच्या सात देशांनी ग्रीनलंड येथे आपली सेना पाठविली आहे. त्यामुळे अमेरिका आणि युरोप यांच्यात युद्ध होणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
दुर्मिळ खनिजांसाठी...
ग्रीनलंड हा देश दुर्मिळ खनिजांनी समृद्ध आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहने यांच्या निर्मितीसाठी ही खनिजे अत्यावश्यक असतात. सध्या या खनिजांवर चीनचा एकाधिकार आहे. ट्रंप यांना तो संपवायचा आहे. त्यामुळे चीनचा या खनिजांवरील प्रभाव संपविण्यासाठी त्यांना ग्रीनलंड हा देश हवा आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे सध्या ग्रीनलंडवरुन युरोप आणि अमेरिकेत प्रचंड शीतयुद्धाचा प्रारंभ झाला आहे.