‘पाचशे टक्के’ ला ट्रंप यांचा पाठिंबा
रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवर लागणार कर
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
रशियाकडून जे देश तेल किंवा ऊर्जा खरेदी करीत आहेत, त्यांनी ही खरेदी पूर्णपणे थांबविली नाही, तर त्यांच्यावर 500 टक्के व्यापार शुल्क आकारण्याचा अधिकार ट्रंप यांना देणाऱ्या विधेयकाला डोनाल्ड ट्रंप यांनी पाठिंबा दिला आहे. हे विधेयक अमेरिकन सिनेटच्या दोन सदस्यांनी सादर केले आहे. या विधेयकावर येत्या दोन आठवड्यांमध्ये सिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. हे विधेयक संमत झाल्यास त्याचा परिणाम भारतासह चीन आणि अन्य देशांवर होणार आहे.
हे विधेयक ‘रशिया निर्बंध विधेयक’ या नावाने ओळखले जात आहे. रिप्‰ब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्रॅहॅम आणि डेमॉव्रेटिक पक्षाचे एक सदस्य यांनी संयुक्तरित्या हे विधेयक सिनेटमध्ये सादर केले आहे. भारत आणि चीन तसेच इतर देश हे रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशियाला युक्रेनशी युद्ध करण्यासाठी बळ प्राप्त होते. रशियाला मिळणारा पैसा थांबवायचा असेल तर त्या देशाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर जबर कर लावला पाहिजे. तरच हे देश तेलाची आयात थांबवितील, अशी अमेरिकेची धारणा असून त्या दृष्टीने हे विधेयक सिनेटमध्ये मांडण्यात आले आहे. हे विधेयक संमत झाल्यास जगाच्या आर्थिक समीकरणांमध्ये मोठे परिवर्तन होऊ शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
ट्रंप यांची भेट
या विधेयकाच्या संदर्भात लिंडसे ग्रॅहॅम यांनी अध्यक्ष ट्रंप यांची भेट घेतली असून त्यांच्याशी सुफळ चर्चा केलाr आहे, अशी माहिती देण्यात आली. ट्रंप यांचा या विधेयकाला पूर्ण पाठिंबा आहे, असे ग्रॅहॅम यांचे प्रतिपादन आहे. या विधेयकावर लवकरच सिनेटमध्ये चर्चा होईल आणि विधेयकावर मतदानही येत्या एक-दोन आठवड्यांमध्ये होईल, अशी शक्यता त्यांनी ट्रंप यांच्या भेटीनंतर व्यक्त केली.
विधेयकात काय आहे...
रशियाकडून स्वस्त तेलाची खरेदी करुन रशियाचे युद्धबळ वाढविणाऱ्या देशांना शिक्षा करण्याचा अधिकार या विधेयकामुळे ट्रंप यांना मिळणार आहे. अशा देशांवर प्रचंड व्यापार शुल्क ट्रंप लावू शकतात. हे शुल्क 500 टक्क्यांपर्यंतही असू शकते. रशियाची युद्धशक्ती कमी करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे, असे ग्रॅहॅम यांचे म्हणणे आहे. हे विधेयक संमत होणार की नाही, हे सिनेटमध्येच ठरणार आहे. ट्रंप यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर कर वाढविण्याचा इशारा दिला होता. त्याच्याशी या विधेयकाचा संबंध आता जोडला जात आहे. त्यामुळे या पुढच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यात संबंध कसे राहतील, हे आणखी काही काळानंतरच नेमकेपणाने स्पष्ट होणार आहे. भारताने रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीत कपात करण्यास प्रारंभ केला आहे. तथापि, ही तेल खरेदी पूर्णपणे थांबविली जाईल काय, हे अद्याप अस्पष्ट आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत यासंबंधातले चित्र अधिक स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.