ट्रंप यांनी अर्धवटच सोडली जी-7 परिषद
महत्वाच्या कारणासाठी अमेरिकेला परतले, तथापि इस्रायल-इराण संघर्षामुळे परतल्याचा केला इन्कार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कॅनडात होत असलेली जी-7 परिषद अर्धवट सोडून अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतला आहे. एका महत्वाच्या कामासाठी आपण अमेरिकेला परतत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, इस्रायल-इराण संघर्ष हे या निर्णयाचे कारण नसल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. त्यांच्या या निर्णयामुळे चर्चेला उधाण आले असून कारणासंबंधी विविध अनुमाने व्यक्त केली जात आहे. या संबंधीचे चित्र काही काळात स्पष्ट होणे शक्य आहे.
आपण जी-7 परिषद सोडून अमेरिकेला परत जात आहोत, यामागे इस्रालय-इराण संघर्ष किंवा त्यांच्यातील शस्त्रसंधी हे कारण नाही. तर त्याहीपेक्षा महत्वाचे आणि अत्यंत मोठे कारण यामागे आहे. आपण प्रतीक्षा करा. हे कारण त्वरित स्पष्ट होणार आहे, असे वक्तव्य करत त्यांनी साऱ्यांची उत्सुकता वाढविली आहे.
मॅक्रॉन यांच्यावर टीका
इस्रायल आणि इराण यांच्यात एक-दोन दिवसांमध्ये शस्त्रसंधी होणे शक्य आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप अमेरिकेला परत गेले आहेत, असे विधान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर ट्रंप यांनी जोरदार टीका केली. इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रसिद्धीप्रिय आहेत. ते जे कारण सांगत आहेत. त्यासाठी मी ही परिषद अर्धवट सोडलेली नाही. नेहमीप्रमाणे मॅक्रॉन याहीवेळी सपशेल चूक ठरले आहेत, अशीही टिप्पणी ट्रंप यांनी केली.
व्हाईट हाऊसचे वक्तव्य
मॅक्रॉन यांनी त्यांचे मत व्यक्त करण्यापूर्वी व्हाईट हाऊसनेही ट्रंप यांच्या परतण्याच्या निर्णयासंबंधी वक्तव्य प्रसिद्ध केले होते. ट्रंप यांनी मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जी-7 परिषद अर्धवट सोडून वॉशिंग्टनला परतण्याचा निर्णय घेतला आहे, असे हे वक्तव्य होते. त्यानंतरच मॅक्रॉन यांनी त्यांचे वक्तव्य केले होते. तथापि, ट्रंप यांनी हे कारण नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे.
त्वरित तेहरान सोडा...
जी-7 परिषद अर्धवट सोडून अमेरिकेला परतण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर काही वेळातच ट्रंप यांनी आणखी एक महत्वाची घोषणा केली आहे. तेहरानमधील सर्व विदेशी नागरीकांनी त्वरित तेहरान सोडावे, अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे अमेरिका तेहरानवर हल्ला करणार आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. सध्या यासंबंधी संदिग्धता असून येत्या काही काळातच चित्र स्पष्ट होईल.
का परतले ट्रंप...
ट्रंप यांनी जी-7 परिषद अर्धवट का सोडली, हा आता आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडात पोहचले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने कदाचित त्यांची डोनाल्ड ट्रंप यांच्याशी भेट होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, ट्रंप कॅनडातून परतल्यामुळे यावेळी ही भेट होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. तरीही, ट्रंप यांनी अचानक हा निर्णय घेतल्याने विविध मते व्यक्त होत आहेत.