For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रथम अध्यक्षीय चर्चेत ट्रंप यांची सरशी

06:04 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रथम अध्यक्षीय चर्चेत ट्रंप यांची सरशी
Advertisement

बायडेन आणि ट्रंप यांनी केले एकमेकांवर व्यक्तीगत आरोप-प्रत्यारोप, निवडणूक रंगतदार होणार

Advertisement

► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेतली अटलांटा येथे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जोसेफ बायडेन आणि त्यांचे प्रतिस्पधीं माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात प्रथम अध्यक्षीय वादविवाद झाला असून त्यात ट्रंप यांची सरशी झाल्याचे मानण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांनी या वादविवादात एकमेकांवर व्यक्तीगत आरोपांचा वर्षाव केल्याचे दिसून आले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, अमेरिकेचा जगाच्या राजकारणावरील प्रभाव, परराष्ट्र धोरण इत्यादी विषयांवर या वादविवादात दोघांनीही त्यांचा पक्ष मांडला.

Advertisement

येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष जोसेफ बायडेन हे डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार आहेत. तर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे त्यांचे प्रतिस्पर्धी असून ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये थेट वादविवाद करण्याची अमेरिकेत प्रथा आहे. प्रत्येक अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी तीन ते चार वेळा असे थेट वादविवाद होतात. या वादविवादाचा परिणाम निवडणुकीवर होतोच असे नाही. तथापि, ज्या उमेदवारची वादविवादांमध्ये सरशी होते, त्याची लोकप्रियता वाढते असा अनुभव आहे. या प्रथेनुसार बायडेन आणि ट्रंप एकमेकांसमोर आले होते.

दीड तास वादविवाद

दोन्ही नेत्यांमधील वादविवादाचा हा प्रथम कार्यक्रम साधारणत: दीड तास चालला. अमेरिकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीला बायडेन यांची विस्कळीत धोरणे जबाबदार आहेत. अमेरिकेची आंतरराष्ट्रीय पत बायडेन यांच्यामुळे ढासळली आहे. बायडेन हे क्रमांक एकचे खोटारडे असून अमेरिकेच्या आतापर्यंतच्या अध्यक्षांमध्ये सर्वात वाईट अशी त्यांची स्थिती आहे, असे गंभीर आरोप ट्रंप यांनी केले.

बायडेन यांचे प्रत्युत्तर

बायडेन यांनीही ट्रंप यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. ट्रंप यांनी त्यांच्या चार वर्षांच्या काळात अमेरिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्याचा परिणाम आजही अमेरिकेला भोगावा लागत आहे. त्यामुळेच पुढच्याच निवडणुकीत ट्रंप यांचा पराभव झाला. त्यांना जनतेने दुसरा कार्यकाळ नाकारला, असा आरोप बायडेन यांनी केला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे आरोप खोडतानाच आपल्या ध्येयांची माहितीही दिली.

व्यक्तीगत आरोप

वादविवादात दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या खासगी जीवनातील कथित घटनाही बाहेर काढल्या. ट्रंप यांनी शेकडो कोटी डॉलर्सचा कर भरलेला नाही. त्यांच्यावर महिलांचा जाहीर विनयभंग करण्याचे आरोप आहेत. एका महिला मॉडेलचे शारिरीक शोषण त्यांनी केल्याचाही आरोप आहे. अशा व्यक्तीला अमेरिका आपला अध्यक्ष म्हणून निवडणे शक्य आहे काय, असा प्रश्न बायडेन यांनी केला.

ट्रंप यांच्याकडून प्रतिवाद

या आरोपांना उत्तर देतांना ट्रंप यांनीही बायडेन यांचा पुत्र हंटर याच्या कथित प्रकरणाचा उच्चार केला. बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदासाठी अकार्यक्षम आहेत. त्यांच्या स्थलांतर धोरणामुळे अमेरिकेची आर्थिक प्रगती खुंटली आहे. बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिका आज एक असभ्य देश बनला आहे. बेरोजगारी वाढण्यास बायडेन यांची धोरणे कारणीभूत आहेत, असे प्रत्युत्तर डोनाल्ड ट्रंप यांनी दिले.

देशात गुन्हेगारांचा सुळसुळाट

बायडेन यांच्या घातक स्थलांतर धोरणामुळे अमेरिकेत समाजविरोधी शक्ती बळावल्या आहेत. बाहेरुन आलेल्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून अमेरिकेच्या नागरीकांच्या हत्या होत आहेत. अमेरिकेतील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत चालली आहे. अध्यक्षांचे देशावर नियंत्रण नसल्याचे हे लक्षण आहे. अशा अध्यक्षाला जनता पुन्हा निवडून देणे शक्य नाही, असा घणाघात डोनाल्ड ट्रंप यांनी या वादविवाद कार्यक्रमात केला.

युक्रेन-रशिया युद्ध हाताबाहेर

बायडेन यांच्या दुर्बळ आणि बोटचेप्या धोरणांमुळे युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध हाताबाहेर गेले. हे युद्ध खरे तर व्हायलाच नको होते. तथापि, बायडेन यांनी वेळेवर परिस्थिती आकलन करुन घेतले नाही. युक्रेनला आजवर विद्यमान अध्यक्षांनी 200 अब्ज डॉलर्सहून अधिक साहाय्य केले आहे. ही फार मोठी रक्कम असून ती वाया गेल्यात जमा आहे, असे आरोप ट्रंप यांनी केले. तर बायडेन यांनी या युद्धासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन जबाबदार असल्याचा प्रतिवाद केला. पुतीन यांनी असंख्य लोकांच्या हत्या केल्या. युव्रेनला साहाय्य शस्त्रास्त्रांचे करण्यात आले आहे. ते आवश्यक होते, असा बचाव बायडेन यांनी केला.

कोण जिंकले, कोण हारले

या वादविवाद कार्यक्रमानंतर अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात ट्रंप यांची सरशी झाल्याचे लोकांचे मत असल्याचे दिसून आले आहे. ट्रंप यांची तयारी बायडेन यांच्यापेक्षा अधिक होती. त्यांनी केलेले आरोप अमेरिकेच्या नागरीकाला पटण्यासारखे आहेत. या आरोपांना चोख आणि नेमके प्रत्युत्तर देण्यात बायडेन कमी पडले, असे बहुसंख्य अमेरिकनांचे मत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

जोरदार वाद-प्रतिवाद

  • अमेरिकेतील प्रथम अध्यक्षीय वादविवादात आरोप-प्रत्यारोपांचा वर्षाव
  • स्थलांतर, गर्भपात धोरण, युक्रेन-रशिया युद्ध या मुद्द्यांवर झाला वाद
  • ट्रप आक्रमक, तर बायडेन बचावात्मक स्थितीत असल्याचे झाले स्पष्ट
  • अनेक आरोपांना नेमके उत्तर देण्यात बायडेन अयशस्वी ठरल्याचे मत
Advertisement
Tags :

.