ट्रंप यांनी दिला रशियाला मोठा दिलासा
भारतालाही होणार लाभ, हटविले तेलावरील निर्बंध
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियावरील तेलविक्रीचे निर्बंध हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे रशिया आता सहजपणे आपले कच्चे इंधन तेल निर्यात करु शकणार आहे. जागतिक बाजारात आणि अमेरिकेतही तेलाच्या किमती भडकल्याने त्या कमी व्हाव्यात आणि किंमतींमध्ये स्थिरता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामुळे भारताचाही मोठा लाभ होणार आहे. भारत रशियाकडून हवे तितके तेल आयात करु शकणार आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दोन्ही लोकप्रतिनिधीगृहांनी अध्यक्ष ट्रंप यांना मोठे अधिकार देणारा ‘लिंडने ग्रॅहेम कायदा’ संमत केला आहे. जे देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतात, त्या देशांच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर 100 टक्के आयातशुल्क लागू करण्याचा अधिकार त्यांना मिळाला आहे. तथापि, त्यांनी हा कायदा उपयोगात न आणण्याचा निर्णय घेतल्याने रशिया आणि रशियाकडून तेल घेणारे देश यांना दिलासा मिळाला आहे. अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या निर्यातीवर सध्या सरासरी 10 टक्के आयातशुल्क लागू केले जात आहे. ट्रंप यांनी भारताविरोधात त्यांना मिळालेला अधिकार उपयोगात आणला असता, तर भारताच्या निर्यातीवर 10 अधिक 100 असा 110 टक्के कर लागू केला जाऊ शकला असता. तथापि, सध्यातरी अशी वाढ होणार नाही, हे निश्चित झाले आहे.
शुक्रवारी आदेशावर स्वाक्षरी
शुक्रवारी (भारताच्या प्रमाणवेळेनुसार शनिवारी) अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियावरील निर्बंध मागे घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यामुळे जगभरातील तेलकोंडी शिथिल होण्याची शक्यता आहे. रशियाचे तेल जागतिक बाजारात आल्याने तेलदरात समाधानकारक घट होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ट्रंप यांनी रशियाकडून डीझेल विकत घेण्यासाठी करार केला होता. त्याला जोडूनच आता निर्बंध हटविण्याचाही निर्णय घेण्यात आल्याने भारतालाही लाभ होणार आहे.
रशियाकडून स्वागत
अमेरिकेच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे रशियाने स्वागत केले आहे. या निर्णयाचा दोन्ही देशांना लाभ होणार आहे. एकमेकांशी संघर्ष करण्यापेक्षा दोन्ही देशांनी एकमेकांना पूरक निर्णय घेतल्यास ते जगाच्या दृष्टीनेही लाभदायक ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया रशियाकडून व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश जागतिक तेलस्थैर्यासाठी काम करु शकतात. त्यामुळे जगाचाही मोठा लाभ होऊ शकतो, असे रशियाचे अमेरिकेतील राजदूत किरील दिमित्रिव्ह यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेला डिझेलही मोठ्या प्रमाणात मिळेल. अध्यक्ष ट्रंप यांच्या निर्णयामुळे अमेरिका आणि रशिया यांच्या संबंधांमध्ये निर्माण झालेला तणावही दूर होऊन जगाच्या अर्थव्यवस्थेत स्थिरता येऊ शकणार आहे. ट्रंप यांच्या या निर्णयासंबंधी जगातील अनेक देशांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्या, तरी युक्रेनने मात्र त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारत-अमेरिका करार...
ट्रंप यांनी घेतलेल्या या निर्णयाचा सकारात्मक परिणाम अनेक इतर बाबींमध्येही होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात बराच काळ प्रलंबित राहिलेला व्यापार करारही आता मार्गी लागू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या कराराच्या प्रथम टप्प्याचे प्रारुप जवळपास निश्चित झाले असून येत्या 10 दिवसांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप भारताच्या निर्यातीवर लागू होणाऱ्या शुल्कासंबंधी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर या कराराला अंतिम स्वरुप मिळू शकते आणि त्वरित त्यावर स्वाक्षऱ्या होऊ शकतात. तसे झाल्यास भारत आणि अमेरिका यांच्या आर्थिक संबंधही पूर्ववत् होऊ शकतात आणि परस्पर व्यापाराला मोठी चालना मिळू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
तेलबाजारात स्थिरता शक्य
ड अमेरिकेच्या निर्णयामुळे जागतिक तेलदरात घट होण्याची दाट शक्यता
ड रशियावरील तेलनिर्बंध हटविल्यामुळे टळले भारतावरचे ‘टॅरीफ’चे संकट
ड भारत आणि यांच्यातीलअमेरिका व्यापार करार मार्गी लागण्याची शक्यता
ड जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार
