हार्वर्ड प्रकरणात ट्रम्प यांना धक्का
परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसाबंदीला न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका संघीय न्यायाधीशाने मोठा धक्का दिला आहे. हार्वर्ड विद्यापीठात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या व्हिसा बंदीला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ट्रम्प प्रशासनाने बुधवारी जारी केलेल्या या घोषणेचा परिणाम देशातील सर्वात जुन्या आणि श्रीमंत महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. सदर विद्यार्थी हार्वर्डच्या संशोधन आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा भाग आहेत.
हार्वर्ड विद्यापीठाने ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती. सदर निर्णय व्हाईट हाऊसच्या (अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय) मागण्या नाकारल्याबद्दल हार्वर्डविरुद्ध सूड म्हणून घेतलेला हा निर्णय असल्याचे संस्थेने म्हटले आहे. यासंबंधी सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी ट्रम्प प्रशासनाच्या या घोषणेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
हार्वर्डचा मुद्दा मान्य
या प्रकरणातील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होण्यापूर्वी ही स्थगिती लागू केली तर संस्थेचे तात्काळ आणि कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला. त्यानंतर हार्वर्डमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी बंद करण्याच्या प्रशासनाच्या मागील प्रयत्नांवर लावण्यात आलेली तात्पुरती स्थगितीही बुरो यांनी वाढवली. गेल्या महिन्यात गृह मंत्रालयाने परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आणि त्यांच्या व्हिसासाठी कागदपत्रे जारी करण्यासाठी हार्वर्डचे प्रमाणपत्र रद्द केले होते, परंतु बुरो यांनी ही कारवाई तात्पुरती थांबवली होती.