कचऱ्याची उचल करणाऱ्या ट्रकमधून पोहोचले ट्रम्प
वृत्तसंस्था/विस्कॉन्सिन
अमेरिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी विस्कॉन्सिन येथे सभा घेतली आहे. ट्रम्प या सभास्थळी सफाई कर्मचाऱ्याचा पेहरावात पोहोचले आणि त्यांनी कचऱ्याची उचल करणाऱ्या ट्रकमधुन प्रवास करत सभास्थळावर प्रवेश केला आहे. अध्यक्ष जो बिडेन यांनी अलिकडेच ट्रम्प समर्थकांना ‘कचरा’ संबोधिले होते. बिडेन यांच्या या वक्तव्याच्या प्रत्युत्तरादाखल ट्रम्प हे विस्कॉन्सिन येथील सभेत सफाई कर्मचाऱ्याच्या वेशभूषेत पोहोचले. यादरम्यान ट्रम्प यांनी कमला हॅरिस आणि बिडेन यांना लक्ष्य केले आहे. कमला हॅरिस या अमेरिकेच्या अध्यक्ष होण्याच्या योग्यतेच्या नाहीत. जो बिडेन आणि कमला हॅरिस सामान्य नागरिकांचा तिरस्कार करतात. मी आणलेला कचऱ्याची उचल करणारा ट्रक हा बिडेन यांना प्रत्युत्तर असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
कमला हॅरिस यांच्याकडून बचाव
हॅरिस यांनी बिडेन यांच्या वक्तव्यापासून अंतर राखले आहे. मी अमेरिकेची अध्यक्ष म्हणून निवडली जाईल, तेव्हा सर्व अमेरिकन नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार आहे. यात मला मतदान न करणारे लोक देखील सामील असून त्यांच्या गरजा आणि इच्छांची पूर्तता करणार असल्याचा दावा हॅरिस यांनी केला.