ट्रम्प यांचा पुन्हा ब्रिक्स देशांना इशारा
डॉलरची साथ सोडल्यास 100 टक्के शुल्क
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांना अमेरिकन डॉलरऐवजी दुसरे चलन स्वीकारल्यास 100 टक्के शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. ब्रिक्स देशांनी दुसरे चलन अवलंबिले तर अमेरिका त्यांची साथ सोडणार असे ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर नमूद केले आहे.
ब्रिक्स देश डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. या देशाने नवे ब्रिक्स चलन निर्माण करू नये. तसेच शक्तिशाली अमेरिकन डॉलरच्या जागी अन्य चलनाचे समर्थन करू नये अन्यथा या देशांना 100 टक्के शुल्काला सामोरे जावे लागेल. आकर्षक अमेरिकन अर्थव्यवसथेत नवे चलन विकण्याची अपेक्षा त्यांनी बाळगू नये. याऐवजी ते एखाद्या मूर्ख देशाचा शोध घेऊ शकतात अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली आहे. ब्रिक्स आंतरराष्ट्रीय व्यापारात किंवा अन्य कुठे अमेरिकन डॉलरची जागा घेईल अशी कुठलीच शक्यता नाही. जो देश असे करण्याचा प्रयत्न करेल, त्याला शुल्काला सामोरे जावे लागेल आणि अमेरिकेची साथ सोडावी लागेल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वी देखील ब्रिक्स देशांना इशारा दिला होता. ब्रिक्स देश जर नवे चलन आणत असतील तर अमेरिकेसोबतच्या त्यांच्या व्यापारावर कमीतकमी 100 शुल्क आकारण्यात येईल. माझ्या या वक्तव्याला धमकी म्हणून नव्हे तर एक स्पष्ट भूमिका म्हणून पाहिले जावे, असे ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये स्वत:च्या हस्ताक्षर सोहळ्यादरम्यान प्रसारमाध्यमांना संबोधित करताना म्हटले होते.
पुतीन यांचे डी-डॉलरायजेशनचे आवाहन
15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला संबोधित करताना रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी डी-डॉलरायजेशनचे आवाहन केले होते. ब्रिक्स देशांना राष्ट्रीय चलनांचे आदान-प्रदान वाढवावे लागेल आणि बँकांमधील सहकार्य वृद्धींगत करण्याची गरज असल्याचे पुतीन यांनी म्हटले होते. तर ब्रिक्स देशांच्या विदेश मंत्र्यांनी रशियाच्या निजनी नोवगोराड येथे झालेल्या बैठकीत भाग घेतला होता. या बैठकीत सदस्य देशांदरम्यान द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाणीत स्थानिक चलनांचा वापर वाढविण्याचे आवाहन करण्यात आले होते.