For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एससीओ परिषदेदरम्यान ट्रम्प प्रशासनाचा सूर नरमला

06:43 AM Sep 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
एससीओ परिषदेदरम्यान ट्रम्प प्रशासनाचा सूर नरमला
Advertisement

भारत-अमेरिकेचे संबंध 21 व्या शतकासाठी निर्णायक : मार्को रुबियो

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनमध्ये एससीओ शिखर परिषदेच्या बॅनर अंतर्गत जगातील तीन महाशक्ती एकत्र आल्यावर याचा प्रभाव अमेरिकेपर्यंत दिसून आला आहे. भारत, चीन आणि रशियाच्या प्रमुखांच्या भेटीदरम्यान भारतातील अमेरिकेच्या दूतावासाकडून अत्यंत महत्त्वाची पोस्ट करण्यात आली. या ट्विटचे टायमिंग आणि यातील आशय भारत-अमेरिका संबंधांसाठी निर्णायक आहे. या पोस्टमध्ये अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांचे वक्तव्यही आहे. भारत आणि अमेरिकेच्या लोकांदरम्यान दृढ मैत्री आमच्या संबंधांचा आधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

अमेरिका आणि भारतामधील भागीदारी सातत्याने नवी उंची गाठत आहे. हे 21 व्या शतकातील निर्णायक संबंध आहेत. चालू महिन्यात आम्ही हे संबंध पुढे नेणाऱ्या शक्यतांवर प्रकाश टाकत आहोत. नवोन्मेष आणि उद्योजकतेपासून संरक्षण आणि द्विपक्षीय संबंधांपर्यंत आमच्या दोन्ही देशांच्या लोकांदरम्यान स्थायी मित्रताच या यात्रेला ऊर्जा प्रदान करत असल्याचे अमेरिकेच्या दूतावासाने नमूद केले आहे.

भारतातील अमेरिकेच्या दूतावासाचा हा ट्विट सोमवारी सकाळीच चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या भेटीनंतर समोर आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के आयातशुल्क लागू केले असताना आणि त्यांचे सल्लागार भारताच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्यं करत असताना या तिन्ही देशांच्या प्रमुखांदरम्यान चर्चा झाली आहे. चीनच्या तियानजिनमध्ये पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती पुतीन आणि अध्यक्ष जिनपिंग यांच्या भेटीची चर्चा सर्वच देशांमध्ये होत आहे. जिनपिंग यांनी एससीओ परिषदेला संबोधित करताना अमेरिकेचा थेट उल्लेख टाळून शीतयुद्धकालीन मानसिकता आणि धमकाविणाऱ्या प्रथांचा विरोध करण्याचा संदेश दिला आहे. एक समान आणि व्यवस्थित बहुध्रूवीय स्वरुप तसेच सर्वांसाठी लाभदायक आणि समावेशक आर्थिक जागतिकीकरणाचा पुरस्कार केला जावा, जागतिक शासन प्रणालीला अधिक न्यायसंगत आणि समतापूर्ण केले जावे असे  जिनपिंग यांनी म्हटले आहे.  तर पुतीन यांनी युरोप आाि आशियात सुरक्षेची एक नवी प्रणाली निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

चीनच्या तियानजिन शहरात एससीओ शिखर परिषदेचे आयोजन झाले आहे. या परिषदेवर जगभरातील नजरा केंद्रीत झाल्या होत्या. खासकरून अमेरिकेकडून अनेक देशांवर भरभक्कम आयातशुल्क लागू करण्यात आल्यावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद पार पडली आहे. यादरम्यान भारत-चीन आणि रशियादरम्यान वाढती जवळकी पाहता अमेरिकेचा सूर नरमला असल्याचे चित्र दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी हे ज्यावेळी चीनच्या तियानजिनमध्ये होते, त्याचवेळी नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासाने भारत-अमेरिका संबंधांवरून ट्विट केला आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के आयातशुल्क लागू केले आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याप्रकरणी अमेरिकेने भारतावर हे आयातशुल्क लागू केले आहे. परंतु भारताने अमेरिकेच्या या निर्णयाला अयोग्य ठरविले आहे. तर दुसरीकडे ट्रम्प प्रशासन सातत्याने भारतावर लादलेल्या आयातशुल्काचा बचाव करत हास्यास्पद आरोप करत आहेत. यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. परंतु अमेरिकेतच ट्रम्प यांच्या आयातशुल्क धोरणाला विरोध होत आहे.

Advertisement
Tags :

.