खरा विकास जनतेच्या कल्याणावर अवलंबून
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचे प्रतिपादन : सावंत सरकारच्या कामाचा घेतला आढावा
पणजी : विविध क्षेत्रातील गोमंतकीय जनतेचा आनंदी निर्देशांक राज्य सरकार लवकरच तयार करणार आहे. खरा विकास हा केवळ आर्थिक उन्नती, साधनसुविधा यावरच अवलंबून नसतो, तर तो जनतेच्या कल्याणावरही अवलंबून असतो, असे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी विधानसभेतील अभिभाषणात नमूद केले. गोव्याचा आरोग्य, सामाजिक जीवन, शिक्षण, पर्यावरण, संस्कृती या क्षेत्रातील निर्देशांक तयार होणार असल्याचेही राज्यपाल म्हणाले.
वर्ष 2026 मधील पहिलेच विधानसभा अधिवेशन असल्याने त्यांनी विधासभेतील सर्व सदस्यांना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संबोधित केले. पेडणे येथे 93.14 हेक्टर्स जमिनीत न्यू मोपा आयुष सिटी विकसित करण्याचे ध्येय असून नोव्हेंबर 2025 पर्यंत रु. 1410 कोटी खर्चाचे एकूण 59 साधनसुविधा प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. शिवाय रु. 100 कोटीच्या 15 प्रकल्पांचे काम सुरू आहे. वर्ष 2025-26 मध्ये गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने रु. 397 कोटी खर्चाच्या 17 प्रकल्पांना मान्यता दिली असून त्यातून 2500 जणांना रोजगार मिळणार आहे. तसेच रु. 2500 कोटीच्या एकूण तीन मेगा प्रकल्पांची खात्री मिळाली असून त्यात 1767 जणांना नोकरी प्राप्त होणार आहे, अशी माहिती राजू यांनी अभिभाषणातून दिली.
बारापैकी पाच खाणी सुरु
बारा खाण ब्लॉकचा लिलाव करण्यात आला असून पाच ब्लॉक सुरु झाले आहेत. त्यातून रु. 252 कोटीचा महसूल मिळाला आहे. किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा 2011 ला मान्यता मिळाली असून 2019 च्या आराखड्यावर सल्लामसलत चालू आहे. अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा खात्याने 2025 या वर्षात 7111 फोन कॉल्सना प्रतिसाद देऊन 140 माणसांना तर 690 जनावरांना वाचवले आहे तसेच रु. 29.54 कोटीची मालमत्ता वाचविली आहे. एकूण 46000 महिलांचा समावेश असलेल्या 3200 स्वयंसेवी गट महिला मंडळांना रु. 380 कोटीचे कर्ज देण्यात आले व त्यातून 4387 लखपती दिदी तयार झाल्याचे राजू यांनी सांगितले.
2037 पर्यंत विकसित गोवा
वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत करण्याच्या धर्तीवर 2037 पर्यंत विकसित गोवा करण्याचा आराखडा अंतिम टप्प्यात असून तोपर्यंत सर्व ध्येये पूर्ण होतील, अशी खात्री राजू यांनी अभिभाषणातून दिली आहे. साधनसुविधा, आरोग्य, शिक्षण, वीज, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, समाजकल्याण, कला, संस्कृती अशा जनतेशी संबंधित खात्यातील कामगिरीचा आढावा राजू यांनी भाषणातून घेतला.
प्रशासन लोकांच्या दारात
गोवा राज्याचा नकाशा प्रथमच कोकणीत तयार करण्यात आला असून वारसा संस्कृतीसाठी कोकणीतून प्रोत्साहन मिळण्यासाठी ते पाऊल ठरणार आहे. ‘माझे घर’ योजनेमुळे लोक सुखी समाधानी होतील. कुशावती या नवीन जिल्ह्यासाठी साधनसुविधा तयार होणार असून प्रशासन लोकांच्या दारात पोहोचणार असल्याचे राजू म्हणाले.
‘बर्च’ दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली
‘बर्च’ आग दुर्घटना आणि लईराई जत्रेतील चेंगराचेंगरीमुळे बळी पडलेल्या सर्व मृतांना विधानसभा अधिवेशनात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर सभापती गणेश गांवकर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. सर्वांनी एक मिनिट उभे राहून शांतता पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विरोधी आमदार सभागृहात हजर नव्हते. तत्पूर्वी राज्यपालांनी आपल्या भाषणातून त्या मृतांना आदरांजली दिली. शिरगांवच्या जत्रेतील चेंगराचेंगरी, बर्च अग्नितांडव प्रकरण, रस्ते अपघातातील बळी यांचा उल्लेख राज्यपालांनी भाषणातून केला आणि चिंता वर्तवली तसेच त्यांना आदरांजली वाहिली.