ट्रकमालक 14 रोजी मध्यरात्रीपासून संपावर
डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ बेमुदत आंदोलन करणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ 14 एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याची घोषणा कर्नाटक ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष षण्मुगप्पा यांनी केली. 14 एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून ट्रकमधील वाहतूक स्थगित होणार आहे. विमानतळांवरील टॅक्सीसेवाही पूर्णपणे बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने डिझेलच्या विक्री करात वाढ केल्यामुळे राज्यात डिझेलचा दर प्रति लिटर 2 रुपये वाढला आहे. दरवाढ मागे घेण्याची मागणी ट्रकमालक संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ 14 एप्रिलपासून ट्रकमालकांनी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रक मालक संघटनेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना षण्मुगप्पा म्हणाले, डिझेलचा दर सात महिन्यांत 5 रुपयांनी वाढला आहे. यामुळे ट्रकसह व्यावसायिक वाहन मालकांवर गळफास घेण्याची वेळ आली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. फिटकेस शुल्क, बॉर्डर चेकपोस्ट, डिझेल दर कपात यासह प्रमुख मागण्यांची पुर्तता क्हावी, यासाठी संपाची हाक देण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीच्या मध्यरात्रीपासून संप सुरु करण्यात येईल. मागण्यांची पुर्तता होईपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. आंदोलनाला पेट्रोल पंप मालकांनीही पाठिंबा दिला आहे, असे ते म्हणाले.
विमानतळांवरील टॅक्सी, खडी-वाळू वाहतुकीची वाहने यासह सर्व प्रकारची व्यावसायिक वाहने स्थगित होतील. सरकारला 14 तारखेपर्यंत मुदत दिली जात आहे. सरकारने आमच्या मागण्यांना प्रतिसाद न दिल्यास 14 रोजी मध्यरात्रीपासून संप हाती घेण्यात येईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.