Karad News : कराडमध्ये ट्रक रिव्हर्स घेताना पिकअप जीपला भीषण धडक
पहाटे कराडमध्ये ट्रक अपघात;
कराड : कराड शहरातील दैत्यनिवारणी चौक परिसरात शनिवारी पहाटे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अठरा चाकी ट्रक रिव्हर्स घेत असताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने कठडा तोडत रस्त्यालगत उभ्या असलेल्या पिकअप जीपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की पिकअपच्या पाठीमागील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर बाजूकडून सातारच्या कदिशेने जाणारा अठरा चाकी ट्रक कोल्हापूर नाक्यावर रस्ता चुकल्याने जुन्या कोयना पुलाच्या दिशेने गेला. मात्र पुलावरील उंचीरोधकामुळे पुढे जाणे अशक्य झाल्याने चालकाने दैत्यनिवारणी चौकातून ट्रक रिव्हर्स घेण्यास सुरुवात केली.
याच वेळी उतारावर ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट घसरत विश्रामगृहा जवळील भंगार दुकानाच्या दिशेने गेला. तेथे कठड्याला धडक देत रस्त्यालगत हॉटेल मधुरालगत उभ्या असलेल्या पिकअप जीपवर आदळला. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त पिकअप जीप क्रेनच्या सहाय्याने पोलीस ठाणे परिसरात हलवण्यात आली.
दरम्यान, ट्रकवरील मुख्य चालक अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये झोपलेला असल्याची माहिती असून, प्रत्यक्षात अल्पवयीन चालक ट्रक चालवत होता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.