आंबोलीत ट्रकच्या धडकेत चिमुकली जागीच ठार
तर आई गंभीर जखमी ; ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात
आंबोली : वार्ताहर
फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आंबोली फौजदारवाडी येथील निकिता प्रसाद राऊत (10) ही जागीच ठार झाली. तर तिची आई चैताली राऊत या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात यु आकाराच्या वळणावर घडली. अपघातानंतर पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक आंबोली घाटात पलटी झाल्याने तब्बल अडीच तासाहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून सदर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निकिता राऊत हिचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर आता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी मातेला उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणण्यात येणार आहे . घटनास्थळी पोलीस हवालदार रामदास जाधव, संतोष गलोले यांसह पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते .