खंडणीखोर महिलेकडं सापडलं घबाड
सातारा :
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व महिलेच्यातील वाद मिटवण्यासाठी तीन कोटींची खंडणी मागून त्यातील एक कोटी रुपये स्वीकारताना महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. पथकाने तिला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांनाही दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा जिल्ह्यातील ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना एक महिला त्यांच्यामधील वाद मिटविण्यासाठी 3 कोटी रुपयांची खंडणी तिच्या वकीलामार्फत विराज रतनसिंह शिंदे (रा. वाई, जि. सातारा) यांना मागणी करीत होती. त्याबाबत लोकप्रतिनिधी यांनी लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीची शहानिशा करुन तक्रारदार विराज रतनसिंह शिंदे हे 17 रोजी स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथे गेले.
तक्रारदार विराज शिंदे यांच्याकडे मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या तक्रारीची विचारपूस केली असता ही महिला राजभवन (मुंबई) येथे उपोषणाला न बसण्यासाठी मंत्री गोरे यांच्याकडे 3 कोटी रुपयांची खंडणीची मागणी तिचे वकील यांच्या मध्यस्तीने करीत आहे.
ती रक्कम न दिल्यास तिने मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्यांची बदनामी करुन मंत्रीपद घालविण्याची धमकी देत आहे. तसेच ते एकदा अपघातातून बचावले आहेत आता जिवंत राहणार नाहीत अशी धमकी दिल्याचे सांगितले. या तक्रारीची खात्री करण्याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याशी संपर्क करुन व्हाईस रेकॉर्डर प्राप्त करुन घेण्यात आले. त्यानंतर दोन शासकीय पंचासह 17 व 19 रोजी तक्रारदार व संबधित महिला यांची त्यांचे वकीलासह चर्चा झाली. त्यामध्ये तक्रारदार महिला 3 कोटी रुपये रोख स्वरुपात दोन टप्प्यात मागत असल्याचे व्हाईस रेकॉर्डवर ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरुन निष्पन्न झाले.
तक्रारदार व लोकप्रतिनिधी यांनी मागणी होत असलेली खंडणीची रक्कम जास्त व ती कॅश स्वरुपात देण्याची असल्याने ती त्यांचे मित्रांकडून गोळा करण्याकरीता दोन दिवसाचा वेळ मागितला. शुक्रवारी तक्रारदार यांनी 1 कोटी रुपये रोख स्वरुपात जुळवाजुळव करुन स्थानिक गुन्हे शाखा सातारा कार्यालयात आले. त्यानंतर संबधित महिलेल्या वकिलांनी त्यांच्याकडे तक्रारदार कॅश घेवून येत असल्याचे सांगितले असता तिने ही रक्कम वकिलाच्या ऑफिसमध्ये घेवून येण्यास सांगितले व संबधित महिला त्या ठिकाणी आली असता तक्रारदार यांनी शासकीय पंचांसमक्ष वकिलाच्या ऑफिसमध्ये संबधित महिलेने 1 कोटी रुपये खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलीस पथकाने तिला रंगेहाथ पकडले.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सातारा शहरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व पोलीस अंमलदार यांनी सदरची कारवाई केली आहे.
- शिंदे गटाचा पदाधिकाऱ्याला अटक
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात संबंधित महिलेसह शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयातही दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला अटक केल्यामुळे याबाबत जिल्ह्यात खळबळ माजली आहे.