तृषाच्या ‘96’चा येणार सीक्वेल
2018 मध्ये प्रदर्शित दाक्षिणात्य चित्रपट ‘96’चा आता सीक्वेल येणार आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटात तृषा कृष्णन आणि विजय सेतुपति यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता याच्या सीक्वेलवरून माहिती समोर आली आहे. सीक्वेलची पटकथा तयार झाली असून लवकरच याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. पहिला चित्रपट भावनात्मक कहाणीसाठी अत्यंत पसंत करण्यात आला होता, अशी माहिती दिग्दर्शक प्रेम कुमार यांनी दिली आहे. 96 हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सी. प्रेम कुमार यांनी केले होते. या चित्रपटात विजय सेतुपति आणि तृषा यांनी राम आणि जानू या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. याचबरोबर चित्रपटात गौरी जी. किशन, आदित्य भास्कर, भगवती पेरुमल, देवदर्शिनी, आदुकलम मुरुगादॉस यांची भूमिका होती. चित्रपट 1996 च्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्मिलनच्या पार्श्वभूमीवर बेतलेला होता.