13 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतणार तृषा
सुपरस्टारसोबत चित्रपटात झळकणार
तृषा कृष्णन ही दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री आहे. सलग दोन दशकांपासून ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तृषा आता 13 वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. दिग्दर्शक विष्णू वर्धन यांच्या चित्रपटात तृषा ही मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तिचा नायक सलमान खान असणार आहे. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
दक्षिणेतील एक अभिनेत्री म्हणून तृषाची कारकीर्द अत्यंत यशस्वी राहिली आहे. तिच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. तृषाने 2010 मध्ये प्रियदर्शन यांचा चित्रपट ‘खट्टा-मीठा’द्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु हा चित्रपट फारसा चालला नव्हता. तृषा आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंदी चित्रपटात काम करणार आहे.
तृषाकडे सध्या अनेक दाक्षिणात्य चित्रपट आहेत. ती सध्या तमिळ चित्रपट ‘विदामुयार्ची’ आणि मल्याळी चित्रपट ‘आयडेंटिटी’चे चित्रिकरण करत आहे. यानंतर ती मणिरत्नम यांचा चित्रपट ‘ठग लाइफ’चे चित्रिकरण सुरू करणार आहे. या चित्रपटात कमल हासन मुख्य भूमिका साकारणार आहेत.
बॉलिवूडमध्ये तृषाची मोठी फॅन फॉलोइंग आहे. तृषाचे चाहते तिच्या बॉलिवूडमधील पुनरागमानची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. तर सलमानसोबतच्या तिच्या जोडीला प्रेक्षक किती पसंत करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.