त्रीसा जॉली-गायत्री यांची विजयी सलामी
वृत्तसंस्था / मॅकॉव
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या मॅकॉव खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तृतिय मानांकित जोडी त्रीसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी महिला दुहेरीत विजयी सलामी देताना जपानच्या सॅटो आणि तेगुची यांचा पराभव केला.
महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ट्रिसा आणि गायत्री यांनी जपानच्या अकेरी सॅटो व माया तेगुची यांचा 15-21, 21-16, 21-14 अशा गेमस्मध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना सुमारे तासभर चालला होता. अन्य एका पात्र फेरीच्या सामन्यात भारताच्या सिक्की रे•ाr आणि ऋत्विका शिवानी यांनी हाँगकाँगची यु आणि चीनची ची यांचा 21-15, 21-10 असा पराभव केला. त्याच प्रमाणे एकेरीच्या सामन्यात भारताच्या आर्यामन टेंडॉनने टी. मनीपल्लीचा 11-21, 21-15, 21-17 असा पराभव केला. भारताच्या अलाप मिश्राला पात्र फेरीतच हार पत्करावी लागली.
तब्बल 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतर या स्पर्धेत भारताचा माजी टॉपसिडेड बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचे पुनरागमन झाले आहे. या स्पर्धेत भारताचा 23 सदस्यांचा संघ सहभागी झाला आहे. दुखापतीमुळे श्रीकांतला सुमारे चार महिने बॅडमिंटन क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. गेल्या मे महिन्यात झालेल्या सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत खेळताना किदांबीला ही दुखापत झाली होती. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुपर 300 दर्जाच्या मॅकॉव बॅडमिंटन स्पर्धेत किदांबीला पुरुष एकेरीच्या मानांकनात सहावे स्थान मिळाले आहे. गेल्या मार्चमध्ये झालेल्या स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदांबी श्रीकांतने उपांत्य फेरी गाठली होती. तसेच त्याने 2021 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक मिळविले होते.