ट्रीसा-गायत्री यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ मॅकॉव
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या मॅकॉव खुल्या सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे महिला दुहेरीतील आव्हान उपांत्यफेरीत समाप्त झाले.
शनिवारी महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत चीन तैपेईच्या हेस शेन आणि हुआंग झु यांनी ट्रीसा आणि गायत्री यांचा 21-17, 16-21, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. ही उपांत्य लढत चुरशीची झाली. चीन तैपेईच्या जोडीने पहिला गेम 21-17 असा जिंकल्यानंतर ट्रीसा आणि गायत्री यांनी दुसरा गेम 21-16 असा जिंकून बरोबरी साधली. पण त्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या गेममध्ये चीन तैपेईच्या जोडीने अचूक आणि वेगवान फटक्याच्या जोरावर भारतीय जोडीचे आव्हान संपुष्टात आणले. चीन तैपेईच्या या जोडीचा ट्रीसा आणि गायत्रीवरील हा तिसरा विजय आहे.