त्रीसा-गायत्री पहिल्याच फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/ टोकियो
भारतीय जोडी ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांचे कुमामोटो मास्टर्स जपान 2024 बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
राष्ट्रकुल कांस्यविजेती ही जोडी 20 व्या क्रमांकावर असून त्यांना चिनी तैपेईच्या जागतिकी 29 व्या मानांकित लिन झिह युन-हसू यिन हुइ यांनी 21-16, 21-16 असे हरविले. पहिल्या गेममध्ये भारतीय जोडी 7-4 अशी पिछाडीवर पडली होती. पण नंतर मुसंडी मारत 8-8 अशी बरोबरी साधली. पण तैपेईच्या जोडीने पुन्हा नियंत्रण मिळवित सलग सहा गुण मिळवित नंतर गेमही जिंकला. दुसऱ्या गेममध्येही तीच कथा राहिली. युन व हुई यांनी वर्चस्व राखत 12-7 अशी बढत घेतली. भारतीय जोडीने सलग पाच गुण घेत बरोबरी साधली असली तरी युन व हुई जोरदार खेळ करीत गेमसह सामना जिंकून दुसरी फेरी गाठली. युन व हुई यांच्याकडून पराभूत होण्याची त्रीसा व गायत्री यांची ही तीन सामन्यातील पहिलीच वेळ आहे. याआधी मकाव ओपन व जर्मन ओपन स्पर्धेत त्रीसा-गायत्री यांनी त्यांचा पराभव केला होता.
एकेरीत पीव्ही सिंधू व लक्ष्य सेन भारताचे आव्हानवीर आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या डेन्मार्क ओपन स्पर्धेत दोघेही शेवटचे बीडब्ल्यूएफ स्पर्धेत खेळले होते. सिंधू सध्या जागतिक क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असून डेन्मार्कमध्ये ती उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली होती. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन हा एकमेव भारतीय खेळाडू असून तो जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर आहे. त्याने दोन स्पर्धांत भाग घेतला, पण नव्या ऑलिम्पिक सायकलमधील स्पर्धेत त्याला अद्याप सामना जिंकायचा आहे.