त्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था / कौलालंपूर
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2025 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या मलेशिया सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला बॅडमिंटनपटूंनी दुहेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या त्रीसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या सहाव्या सिडेड जोडीने थायलंडच्या बिगर मानांकित जोडी जे. ओर्निचा आणि सुकिता सुवाची यांचा केवळ 30 मिनिटांच्या कालावधीत 21-10, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्रीसा आणि गायत्री या जोडीने लखनौमध्ये झालेल्या सय्यद मोदी सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते.
1.45 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या या स्पर्धेत पुरूष दुहेरीत भारताचे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी तसेच पुरुष एकेरीत लक्ष्य सेन दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.