गोमेकॉत ‘आयव्हीएफ’द्वारे तिळ्यांना जन्म
गोमेकॉतील आयव्हीएफ केंद्राचे मोठे यश : लाखो रुपयांचा उपचार गोमेकॉत मोफत
पणजी : मुले नसलेल्या दाम्पत्यांसाठी गोवा सरकारने सुरू केलेल्या मोफत आयव्हीएफ उपचार योजनेतून एका महिलेला तिळे (तीन मुले) प्राप्त झाले आहे. गोमेकॉतील आयव्हीएफ केंद्राचे हे मोठे यश असल्याचे सांगून मुले नसल्याने निराश असलेल्या दांपत्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केली आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात मुले होण्यासाठी राज्य सरकारने आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) सेवा सुरू केली असून ती पूर्णपणे मोफत आहे. खासगी इस्पितळात मात्र त्या उपचारासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. पण गोवा सरकारने गोव्यातील महिलांसाठी ती सुविधा मोफत उपलब्ध केली आहे. विवाहानंतर अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळे अपत्य होत नाही. त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली असून त्याचे पेंद्र गोमेकॉत आहे. सदर उपचारामध्ये महिलेच्या अंडाशयातील अंडी आणि पुरुषाचे शुक्राणू यांना एकत्र आणून त्याचे प्रयोग शाळेत मिलन केले जाते. त्यातून तयार झालेला गर्भ महिलेल्या गर्भाशयात सोडण्यात येतो. त्यातून पुढे गर्भ वाढतो आणि नंतर मुलांचा जन्म होतो. महिलांना मातृत्वाचा आनंद देणारी ही उपचार पद्धती लोकप्रिय होत असून मुले नसलेली अनेक दांपत्ये त्यासाठी नोंदणी करीत असल्याचे समोर आले आहे.
एक मुलगा दोन मुलींना जन्म
तिळ्यांमध्ये एक मुलगा व दोन मुलींचा समावेश असून मुलाचे वजन 2.30 किलो तर मुलींचे वजन 1.70 व 1.50 किलो इतके आहे. महिलेसह सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गोमेकॉच्या सूत्रांनी दिली.