बेळगावच्या संत मीराला तिहेरी मुकुट
हँडबॉल स्पर्धेत कर्नाटक, आंध्र प्रदेश विजेते
बेळगाव : विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने चारी गटाचे विजेतेपद व क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने तिहेरी मुकुट तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद आंध्र प्रदेशने पटकाविले. अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या मैदानावर राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगांवने गुलबर्गा संघाचा 8-0 असा पराभव केला, तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगांवने गुलबर्गा संघाचा 4-0 असा पराभव केला,
17 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने बळ्ळारी जिह्या संघाचा 9-5 असा पराभव केला. तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने गुलबर्गा संघाचा 11-0 असा एकतर्फी पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तर क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेत प्राथमिक मुलाच्या अंतिम लढतीत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना संत मीरा संघाने आंध्रप्रदेशचा 11-3 असा पराभव केला, तर माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत आंध्र प्रदेशने संत मीरा कर्नाटकचा अटीतटीच्या लढतीत 11 -10 असा पराभव केला, आता आगामी 9 नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी वरील विजेते संघ पात्र ठरले आहेत.
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा भारती राज्य सचिव ए.बी. शिंत्रे, जिल्हा युवजन सेवा क्रीडा खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी विलास घाडी, विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, सी. आर पाटील या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक पदक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी क्रीडाशिक्षिका मयुरी पिंगट, शिवकुमार सुतार, यश पाटील, सुजल मलतवाडी, सिद्धांत वर्मा ,अभिषेक गिरीगौडर , चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील, बापूसाहेब देसाई, शामल दड्डीकर, धनश्री सावंत उपस्थित होते. पंच उमेश मजुकर, जयसिंग धनाजी यांनी काम पाहिले.