तृणमूल खासदार नुरुल इस्लाम यांचे निधन
ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले दु:ख
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे खासदार हाजी नुरुल इस्लाम यांचे बुधवारी निधन झाले आहे. नुरुल इस्लाम हे दीर्घकाळापासून लिव्हर कॅन्सरने ग्रस्त होते. तृणमूल खासदाराने उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील स्वत:च्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आहे. नुरुल हे निधनासमयी 61 वर्षांचे होते.
हाजी नुरुल इस्लाम यांच्या निधनावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. बशीरहाटचे आमचे खासदार हाजी एसके नुरुल इस्लाम यांच्या निधनाबद्दल कळल्यावर दु:ख झाले. ते माझे महत्त्वपूर्ण सहकारी होते. दुर्गम सुंदरबन क्षेत्रातील ते एक समर्पित सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांनी मागास क्षेत्रात गरीब लोकांच्या कल्याणासाठी कठोर मेहनत केली होती. बशीरहाटचे लोक त्यांचे नेतृत्व स्मरणात ठेवतील त्यांचा परिवार, मित्र आणि सहकाऱ्यांबद्दल स्वत:च्या संवेदना व्यक्त करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
नुरुल इस्लाम हे पहिल्यांदा 2009 साली बशीरहाट मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. तर 2016 मध्ये बशीरहाटमधील हरोआ विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडून आले होते. 2024 मध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत नुरुल इस्लाम यांनी विजय मिळविला होता. त्यांनी भाजपच्या उमेदवार रेखा पात्रा यांना मोठ्या फरकाने पराभूत केले होते.