तृणमूल खासदार जवाहर सरकार यांचा राजीनामा
कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी गुऊवारी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी राजीनामा दिला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना लिहिलेल्या पत्रात जवाहर सरकार यांनी तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. कृपया आपले राजीनामापत्र स्वीकारा, असे त्यांनी म्हटले आहे. कोलकाता बलात्कार हत्याकांडाच्या विरोधात जवाहर सरकार यांनी यापूर्वीच खासदारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. राजीनाम्याच्या घोषणेनंतर ममता बॅनर्जींनी त्यांना फोन करून राजीनामा पत्रावर पुनर्विचार करण्याची विनंती केली, मात्र जवाहर सरकारने ममता बॅनर्जींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. त्यांनी सर्वसामान्यांना वचन दिले असून आता राजीनामा देण्यापासून मागे हटणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.