तृणमूल खासदाराने मागितली जाहीर माफी
लक्ष्मी पुरींवर केलेले आरोप अंगलट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेस खासदार साकेत गोखले यांनी माजी राजनयिक अधिकारी लक्ष्मी पुरी यांची जाहीर माफी मागितली आहे. 13 आणि 23 जून 2021 रोजी लक्ष्मी पुरी यांच्या विरात केलेल्या स्वत:च्या ट्विट्ससाठी बिनशर्त माफी मागतो असे साकेत गोखले यांनी म्हटले आहे. संबंधित ट्विट्सध्ये लक्ष्मी पुरी यांच्या विदेशातील संपत्ती खरेदीप्रकरणी मी चुकीचे अन् आधारहीन दावे केले होते, यासंबंधी मला आता खेद असल्याचे गोखले यांनी नमूद केले आहे.
2021 मध्ये साकेत गोखले यांनी माजी आयएफएस अधिकारी आणि संयुक्त राष्ट्रसंघात सहाय्यक महासचिव राहिलेल्या लक्ष्मी पुरी यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. लक्ष्मी पुरी आणि त्यांच्या पतीवर संपत्ती आणि खासकरून स्वीत्झर्लंडमध्ये एका अपार्टमेंटच्या खरेदीवरून गोखले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते तसेच ईडीकडून चौकशीची मागणी केली होती. लक्ष्मी पुरी या केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या पत्नी आहेत.
लक्ष्मी पुरी यांनी या आरोपांना खोटे अन् मानहानिकारक ठरवत दिल्ली उच्च न्यायालयात साकेत गोखले विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. जुलै 2024 मध्ये उच्च न्यायालयाने गोखले यांना दोषी ठरविले होते. तसेच याचिकाकर्त्या लक्ष्मी पुरी यांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश गोखले यांना दिला होता. याचबरोबर गोखले यांना जाहीर माफी मागण्याचा आणि तो माफीनामा स्वत:च्या एक्स हँडलवर 6 महिन्यांपर्यंत पिन करून ठेवण्याचा निर्देश देण्यात आला होता. तसेच एका राष्ट्रीय वृत्तपत्रात माफीनामा प्रकाशित करण्यास सांगण्यात आले होते.
याचबरोबर न्यायालयाने साकेत गोखले यांना भविष्यात लक्ष्मी पुरींच्या विरोधात कुठल्याही सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर कुठलीही आक्षेपार्ह सामग्री प्रकाशित करण्यापासून रोखले हेते.