तृणमूल हा भाजपचा सहकारी ः राहुल गांधी
ममता बॅनर्जींच्या पक्षावर शाब्दिक हल्लाबोल
वृत्तसंस्था/ शिलाँग
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मेघालयात जाहीरसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले आहे. तृणमूल काँग्रेस हा भाजपचा सहकारी आहे. गोव्यात तृणमूलने भाजपला लाभ मिळवून दिला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसचा इतिहास लोक जाणून आहेत. बंगालमध्ये होणारी हिंसाही आता सर्वांसमोर आली आहे. तृणमूलने गोव्यातील निवडणूक प्रचंड रक्कम खर्च करत लढविली आहे. भाजपला मदत करणे हाच तृणमूलचा यामागील विचार होता. मेघालयातही तृणमूल काँग्रेस आता भाजप सत्तेवर यावा दृष्टीने निवडणूक लढवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
संसदेतील भाषणाद्वारे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही थेट प्रश्न विचारले होते. अडानींसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल विचारणा केली होती. तसेच एक छायाचित्र दाखविले होते, ज्यात नरेंद्र मोदी हे अदानींसोबत एका विमानात दिसून आले होते. माझ्या एकाही प्रश्नाचे मोदींनी उत्तर दिले नव्हते. मोदींनी उलट मला एक प्रश्न विचारत माझे आडनाव गांधी का, नेहरू का नाही असे म्हणून पूर्ण चर्चा टाळली होती असा शाब्दिक हल्ला राहुल गांधींनी चढविला आहे.
राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना अदानी समुहावरून लक्ष्य केले होते. 2014 नंतर अदानींच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे राहुल म्हणाले होते. मेघालयात 27 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
प्रसारमाध्यमांवर निशाणा
राहुल गांधी यांनी सभेत बोलताना प्रसारमाध्यमांना लक्ष्य केले आहे पंतप्रधान मोदीनी स्वतःच्या हस्तकांद्वारे प्रसारमाध्यमांना नियंत्रित केले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये माझे भाषण दिसून येणार नाही, कारण मोदींशी संबंधित 2-3 मोठय़ा उद्योजकांकडून प्रसारमाध्यमांना नियंत्रित केले जाते. प्रसारमाध्यमांमध्ये आम्ही आता स्वतःला व्यक्त करू शकत नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.