‘तृणमूल’तर्फे कोलकात्यात शहीद दिनानिमित्त भव्य रॅली
ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादव यांची उपस्थिती
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवार, 21 जुलै रोजी कोलकाता येथे शहीद दिनी रॅली काढली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस नेत्यांव्यतिरिक्त समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही रॅलीला संबोधित केले. पश्चिम बंगालमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर टीएमसीची ही पहिली मोठी रॅली ठरली. यात लाखो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तृणमूल काँग्रेसच्यावतीने आयोजित शहीद दिनाच्या रॅलीत बोलताना सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी केंद्रातील रालोआ सरकारवर टीकास्त्र साधले. आपण देशाच्या राजकारणाकडे पाहत असताना जातीयवादी शक्ती षड्यंत्र रचत असल्याचे स्पष्टपणे दिसून येतेत. देशातील सध्याचे सत्ताधारी वेगवेगळ्या ठिकाणी सतत कट रचण्यातच गर्क असल्याची टिप्पणी अखिलेश यादव यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला उद्देशून केली. तसेच सध्याचे सरकार काही दिवसांचे पाहुणे आहेत. लवकरच देशातील रालोआचे सरकार कोसळणार आहे. एक दिवस हे सरकार पडेल्यानंतर तुमच्या-आमच्यासाठी आनंदाचे दिवस येतील, असा दावाही अखिलेश यांनी केला.
ममता बॅनर्जींचीही अखिलेशना साथ
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखिलेश यादव यांचे विशेष आभार मानतानाच त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. दिल्लीतील रालोआचे सरकार फार काळ टिकू शकत नाही, हे पूर्णसत्य असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात केलेल्या कामगिरीचे कौतुकही ममतांनी केले. अभिषेक बॅनर्जी यांनी ‘400 पार’चा दावा करणाऱ्या आघाडीला 240 वरच थांबवण्यात आपल्याला यश आल्याचे स्पष्ट केले. तसेच भाजपकडे ईडी-सीबीआय सारख्या सर्व एजन्सी आहेत पण तृणमूलकडे जनता जनार्दन आणि तृणमूलचे कार्यकर्ते आहेत, असे ते पुढे म्हणाले.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ मेळावा
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 21 जुलै 1993 रोजी कोलकातामध्ये फोटोसह मतदार ओळखपत्राच्या मागणीसाठी निदर्शने झाली होती. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काँग्रेसचे 13 कार्यकर्ते ठार झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ ममता बॅनर्जी दरवषी 21 जुलै हा ‘शहीद दिन’ म्हणून साजरा करतात. ममता त्यावेळी काँग्रेसच्या युवा विंगच्या अध्यक्षा होत्या. तर पश्चिम बंगालमध्ये त्यावेळी माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीची सत्ता होती. ममता बॅनर्जी दरवषी शहीद दिनाच्या रॅलीच्या व्यासपीठावरून पक्षाची रणनीती जाहीर करतात.