सिंधुदुर्गातील खरीप नुकसानीचे तातडीने पंचनामे; आठही तालुक्यांत पथके सक्रिय; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता-2016 मधील सुधारित निकषांनुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यांत ‘ट्रिगर-1’ लागू झाल्यानंतर खरीप नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ही कार्यवाही गतीने हाती घेण्यात आली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड आणि वैभववाडी या आठही तालुक्यांमध्ये खरीप हंगाम 2026 मधील पिकांची स्थिती, पावसातील तूट आणि संभाव्य नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
प्रत्येक तालुक्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या समन्वयातून संयुक्त पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
पंचनाम्यादरम्यान शेतपातळीवरील पीक नुकसानीची अचूक नोंद घेण्यावर भर देण्यात येणार आहे. नुकसानीच्या नोंदीसोबत संबंधित ठिकाणाचे जीपीएस लोकेशन आणि आवश्यक छायाचित्रे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी अहवाल तयार केला जाणार आहे.