सीमाभागात आज हुतात्म्यांना अभिवादन
म. ए. समितीतर्फे बेळगाव, कंग्राळी खुर्द, खानापूर, निपाणीत आयोजन : मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आज शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन करण्यात येणार आहे. समितीतर्फे हुतात्मा चौक, कंग्राळी खुर्द, खानापूर, निपाणीत आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला समिती नेते व कार्यकर्ते रवाना होणार आहेत. यामध्ये मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
हुतात्मा चौकात अभिवादन सभा
दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. त्याचप्रमाणे शुक्रवार दि. 17 रोजी बेळगावातील हुतात्मा चौकात सकाळी 9 वाजता अभिवादन कार्यक्रम होईल. त्यानंतर रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली आणि किर्लोस्कर रोडमार्गे मूकफेरी निघणार आहे. त्यानंतर हुतात्मा चौकात अभिवादन सभा होणार आहे. कंग्राळी खुर्दमध्ये तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता हुतात्मा बाळू निलजकर यांना अभिवादन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन होईल. त्यानंतर हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांना अभिवादन करून मूकफेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर महात्मा फुले सभागृहात सभा होईल. खानापुरात सकाळी 9.30 वाजता हुतात्मा नागाप्पा होसूरकर स्मारकात अभिवादन कार्यक्रम होईल.
निपाणीतही हुतात्म्यांना अभिवादन
निपाणीतही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावात झालेल्या कर्नाटक पोलिसांच्या गोळीबारात पै. मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे आणि निपाणीत कमळाबाई मोहिते यांनी हौतात्म्य पत्करले. सत्याग्रही बाळू निलजकर, नागाप्पा होसूरकर, गोपाळ अप्पू चौगुले यांचे तुरुंगात निधन झाले. या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषिकांनी व्यवहार बंद ठेवून अभिवादन कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन म. ए. समितीने केले आहे.