त्रिभंगी देहुडा..
त्रिभंगी म्हणजे तीन ठिकाणी वाकलेली मुद्रा! मांडी, गुडघा आणि पाऊल या तीन ठिकाणी वळण घेतलेली आकर्षक ठेवण. ‘देहुडा’ म्हणजे दीड पाऊल; म्हणजेच एक पाय दुसऱ्या पावलाजवळ तिरपा ठेवून उभे राहण्याची सुंदर पद्धत. अशा त्रिभंगी देहुडा मुद्रा धारण करून, कल्पवृक्षाच्या कल्पद्रुमाच्या खाली उभा राहून श्रीकृष्ण गोड बासरी वाजवत आहे अशी कल्पना करून रचलेलं हे अतिशय सुंदर गीत!
त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये
कल्पद्रुमातळी वेणू वाजवीत आहे
गोविँदु वो माये गोपाळु वो
सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु वो
त्रिभंगी म्हणजे तीन ठिकाणी वाकलेली मुद्रा! मांडी, गुडघा आणि पाऊल या तीन ठिकाणी वळण घेतलेली आकर्षक ठेवण. ‘देहुडा’ म्हणजे दीड पाऊल; म्हणजेच एक पाय दुसऱ्या पावलाजवळ तिरपा ठेवून उभे राहण्याची सुंदर पद्धत. अशा त्रिभंगी देहुडा मुद्रा धारण करून, कल्पवृक्षाच्या कल्पद्रुमाच्या खाली उभा राहून श्रीकृष्ण गोड बासरी वाजवत आहे अशी कल्पना करून रचलेलं हे अतिशय सुंदर गीत! भारतीय संस्कृतीत, अध्यात्मात आणि कलाविश्वात श्रीकृष्णाच्या रूपाने अनादी काळापासून मानवी मनाला भुरळ घातली आहे. त्याचे बाळरूप जितके लोभसवाणे आहे, तितकेच त्याचे तरुणपणचे वेणूगोपाल रूप मनाला संमोहित करणारे आहे. या वेणूगोपाल रूपाचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे त्याची ‘त्रिभंगी देहुडा’ उभे राहण्याची पद्धत! संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मधुर वाणीतून या मुद्रेचे वर्णन अशा शब्दांत केले आहे. पण म्हणजे नक्की काय? हा केवळ शरीराचा एक बाक आहे की त्यामागे काही गूढ सौंदर्यशास्त्र लपलं आहे? तर त्रिभंगी मुद्रा हे केवळ धार्मिक प्रतीक नाही, तर ते भारतीय कलाशास्त्राचे शिखर आहे. सरळ उभी असणारी मूर्ती स्तब्ध वाटते, पण त्रिभंगी मुद्रेतील मूर्तीमध्ये एक प्रकारची गतिशीलता आणि जिवंतपणा जाणवतो. ओडिसी आणि भरतनाट्याम या शास्त्राrय नृत्यांमध्ये त्रिभंगी मुद्रेला अत्यंत मानाचे स्थान आहे. भारतातील प्राचीन मंदिरांमधील (जसे की खजुराहो, वेरुळ किंवा उडिसाची मंदिरे) अप्सरा, यक्षिणी आणि देवांच्या मूर्ती याच त्रिभंगी मुद्रेत कोरलेल्या आढळतात, कारण ही मुद्रा मानवी शरीराचे स्त्राrत्व आणि पुरुषत्वाचे सौंदर्य सर्वोच्च पातळीवर अधोरेखित करते.
ज्ञानेश्वर माऊली जेव्हा या रूपाचे वर्णन करतात, तेव्हा ते केवळ एका मूर्तीचे वर्णन करत नसतात, तर ते त्या रूपामागील अथांग आनंदाचा अनुभव घेत असतात. कल्पवृक्षाच्या (कल्पद्रुमाच्या) सावलीत, काठावर यमुना वाहत असताना, अंगावर पीतांबर नेसलेला आणि त्रिभंगी मुद्रेत उभा राहून बासरी वाजवणारा तो सावळा कृष्ण पाहिला की पाहणाऱ्याचे भान हरपून जाते.
माऊली म्हणतात की, हे रूप पाहताच ‘अवघा परमानंदु वो’ अशी अवस्था होते. म्हणजे मनाच्या आत आणि बाहेर फक्त आणि फक्त आनंदच शिल्लक राहतो. जो श्रीकृष्ण संपूर्ण चराचरात, शून्यात आणि स्थावर-जंगमात व्यापून राहिला आहे, तो भक्तासाठी इतका सुंदर आणि सगुण होऊन उभा आहे, हीच भक्ताची सर्वात मोठी अनुभूती आहे. वास्तविक संतांना खरं वेड होतं ते विठ्ठलाचं. विष्णूच्या या सर्वजनांना पूज्य असणाऱ्या आणि आपल्यातलाच एक वाटणाऱ्या या रूपाचं वेड याची मोहिनी ही अपूर्व आहे, यात शंकाच नाही. याचा मोठा आविष्कार म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगामध्ये त्यांची नाममुद्रिका जी असते ती ‘बापरखुमादेवीवरु विठ्ठले’ अशा पद्धतीने केलेली असते. कारण त्यांच्या आई-वडिलांची तीच नावं होती, विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई! त्यांची नावंही या निमित्ताने ते आपल्या अभंगांमध्ये गुंफतात आणि देवाचं नावही गुंफतात.
ही रचना जरी अभिजात असली तरी पण या रचनेचा वापर मात्र शास्त्राrय संगीतावर आधारित आणि लोकसंगीतावर आधारित अशा दोन्ही प्रकारे केलेला आढळतो. त्यामुळे या रचनेला एकापेक्षा जास्त चाली आहेत. हा अभंग संगीत क्षेत्रातही खूप लोकप्रिय आहे. ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी त्यांच्या ‘तल्लीन गोविंद’ या अल्बममध्ये हा अभंग अत्यंत मधुर सुरात स्वरबद्ध करून गायला आहे, जो आजही तितक्याच आवडीने ऐकला जातो. हा अभंग श्रीधर फडके यांच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे घराघरांत पोहोचला असला, तरी अनेक शास्त्राrय गायक, कीर्तनकार आणि उदयोन्मुख कलाकारांनी आपापल्या वैशिष्ट्यापूर्ण शैलीत या अभंगाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या सादर केल्या आहेत. Ragaर्ऱेंऊ च्या मंचावर हा अभंग एका वेगळ्या पद्धतीने सादर केला गेला आहे. संगीतकार अरुण जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांनी या आवृत्तीला संगीतबद्ध केले असून, यशवंतराव चव्हाण नाट्यागृह (पुणे) येथे याचे थेट सादरीकरण करण्यात आले होते.
सरळ उभं असण्यापेक्षा त्रिभंगी मुद्रा जी असते ती अतिशय आकर्षक वाटते. दुसरा पाय अत्यंत बाकदार पद्धतीने पहिल्या पायावरती ठेवलेला त्यामुळे कमरेला आलेलं वळण आणि बासरी वाजवताना मान कलती करणे या सगळ्यामुळे श्रीकृष्णाचे मोहक आणि लोभस रूपडं आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं. त्याचं बऱ्याच संतांनी वर्णन केलेलंच आहे. संत गोरा कुंभारमध्ये असलेलं अजून एक पद असं आहे की ज्याच्यामध्ये या मुरली वाजवणाऱ्या कृष्णाचं फार सुंदर वर्णन आलेलं आहे. ते म्हणजे
देहुडाचरणी वाजवितो वेणू
गोपिकारमणु स्वामी माझा
स्वामी माझा.
वेणुमाधव किंवा वेणुगोपाल असणारं जे श्रीकृष्णाचं रूप आहे ते बऱ्याच ठिकाणी पूजलं जातं. विशेषत: दक्षिणेकडे काही ठिकाणी आणि उत्तरेकडे जिथे कृष्णाचं खरोखरच मूळ जन्मस्थान किंवा जिथे कृष्ण वावरला ती स्थानं म्हणजे मथुरा, गोकुळ, वृंदावन या सर्व स्थानांमध्ये त्याचं हे रूप फार लोकप्रिय आहे. कारण हा कृष्णाच्या आयुष्यातलाही सर्वात आनंदाचा आणि बहारीचा काळ होता. गोकुळ सोडल्यापासून कृष्णाला बासरी जी खाली ठेवावी लागली ती त्यानंतर त्याला आयुष्यभर सुदर्शन हातात घेऊनच वावरावं लागलं. साक्षात विष्णूचा अवतार असूनही योद्ध्याचं रूप हीच त्याची पुढच्या आयुष्यातली ओळख राहिली. राजकारण करण्यातच त्याचा उभा जन्म त्याला खर्च करावा लागला. त्यामुळे ही बासरी आणि हे सूर जोपर्यंत त्याची सोबत धरून होते तोपर्यंत त्याच्या आयुष्यातला बहारीचा काळ होता. आणि त्या काळात त्याला मिळालेला आनंद सुद्धा अपरिमित असणार. म्हणून तर इतरांना आनंद देऊ शकला तो. आपल्या संस्कृतीने कृष्णाचं हे कलाकार रूप कायमचं लक्षात ठेवलेलं आहे. महाराष्ट्रात जरी सुदर्शनधारी श्रीकृष्णाचं कौतुक असलं तरी बंगालमध्ये किंवा उत्तर भारतातही त्याचे हे मुरलीधर रूप अत्यंत पूज्य आहे. कारण आनंदाचं ते निखळ रूप आहे हे मात्र खरं.
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु
